लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाने १७ मे रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना फटका बसला आहे. या दरम्यान झालेल्या मनुष्यहानीसह शेती, फळबागा, जनावरे, घरांचे आणि मच्छिमार बांधवांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईपोटी ठाणे जिल्ह्याला या आधी १२ लाखांची व आता काही दिवसांपूर्वी वाढीव दराने राज्य शासनाने तब्बल सहा कोटी ६८ लाख ४८ हजार अशी सहा कोटी ८० लाख ४८ हजार रुपयांची भरपाई दिली. यात सर्वाधिक अंबरनाथ तालुक्याला दोन कोटी ५० लाख ६१ लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे
तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या विविध स्वरूपाच्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार नुकसानग्रस्तांना वाढीव दराने भरपाई लागू केली आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळामध्ये दिलेल्या दरानुसार ‘तौक्ते’ चक्रीवादळातील बाधित व्यक्तींना मदत देण्याचा निर्णय घेऊन ३ जून रोजी जारी निर्णयानुसार जिल्ह्यातील या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाने भरपाई दिली आहे. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी जिल्ह्यातील प्रांत व तहसीलदारांना आदेश जारी करून या प्राप्त निधीचे वाटप करण्याचे आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील ठाणेसह मीरा-भाईंदर, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, भिवंडी या सर्व तालुक्यांना या तौक्ते चक्रीवादळाचा आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये मृत व्यक्ती, पिकांचे नुकसान, जनावरांचा मृत्यू, घरांचे पूर्ण व अंशतः झालेले नुकसान मच्छिमारांची जाळी, बोटी, मत्स्य बीज, दुकानदार टपरीधारक, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून त्यास अनुसरून नुकसानग्रस्तांना, शेतकऱ्यांना, मृतांच्या वारसांना नुकसान भरपाईची रक्कम जिल्ह्यातील तहसीलदारांकडून वाटप करण्यात येत आहे.
------