लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : ठाणे जिल्हा हिरवागार करण्याचे स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी श्रीमलंग गड परिसरातील मांगरूळ गावात एक लाख रोपे लावण्याचे महाअभियान यशस्वी केले. अतिशय जल्लोषात शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या वृक्षारोपण अभियानात १५ हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला.राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे गौरवोद्गार युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी काढले. उन-पावसाचा खेळ सुरू असल्याने उपक्रमास निसर्गानेही साथ दिल्याचे ठाकरे यांनी सांगितले. केवळ वृक्षारोपण करून थांबणार नसून ही रोपे जगवून पाच वर्षांत या परिसराचे रूपांतर मानवनिर्मित देखण्या वनराईत करण्याची ग्वाहीही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या वेळी दिली. याप्रसंगी आदित्य ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, दिव्यज्योती ट्रस्ट, सीए असोसिएशन, एनएनएसचे विद्यार्थी, विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला बचत गट, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक, ज्येष्ठ नागरिक संघ, अंगणवाडी स्वयंसेविका आदी सहभागी झाले होते.आज प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. प्रतिव्यक्ती झाडांचे प्रमाण भारतापेक्षा चीनमध्ये जास्त आहे. निदान याबाबतीत तरी चीनच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करूयात, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.उपमुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी मांगरूळ येथे ८५ एकर जागा उपलब्ध करून दिली. ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरु कुल महाविद्यालयाच्या ७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. ‘महाराष्ट्र नेचर पार्क’चे उपसंचालक अविनाश कुबल यांचे या अभियानाला सहकार्य लाभले.या प्रसंगी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, महापौर राजेंद्र देवळेकर, मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपमुख्य वन संरक्षक रामगावकर, मांगरूळच्या सरपंच नंदिता पाटील, अभिनेते संतोष जुवेकर, मंगेश देसाई, उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने आदी उपस्थित होते.खंबाळपाड्यातही वृक्षारोपण राज्य सरकारच्या चार कोटी वृक्षारोपणाच्या अभियानाचा एक भाग म्हणून बुधवारी खांबाळपाडा येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सावित्रीबाई फुले कलामंदिर ते पत्रीपूलदरम्यानच्या तीन किलोमीटरच्या रस्त्यांच्या दुतर्फा रोपे लावण्यात आली.केडीएमसी हद्दीत एक लाख रोपांची लागवड आणि त्यांची देखभाल करण्याचे उद्दिष्ट आहे. पहिल्या टप्प्यात खांबाळपाडा परिसरात गुलमोहराची झाडे लावली आहेत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळ््यात बहरणाऱ्या व फुलणाऱ्या विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्याचा मानस आहे.त्यामुळे सर्व ऋतूंमध्ये फुले फुललेली दिसतील, अशा प्रकारचे नियोजन केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या वेळी भाजपाचे नगरसेवक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसर नटणार हिरवाईने
By admin | Published: July 06, 2017 5:55 AM