अंबरनाथ : अंबरनाथ शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. रात्रीदेखील पावसाचा जोर कायम राहिल्याने अनेक वस्तीतील नागरिकांवर गुडघाभर पाणी असतानादेखील त्याच पाण्यात घराघरात रात्र काढण्याची वेळ आली होती. पालिका प्रशासनाने या नागरिकांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, नागरिकांनी नकार दिल्याने पालिका प्रशासनदेखील हतबल झाले होते.
अंबरनाथमध्ये कमलाकरनगर, नालंदानगर, बुवा पाडा, गांधीनगर, भगतसिंगनगर आणि स्वामीनगर या भागातील नागरी वस्तीला पुराच्या पाण्याचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यातील असंख्य भाग हा नाल्याच्या शेजारी असल्याने नाल्यातील पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले होते. दिवसभर भगतसिंगनगर परिसरात कमरेपर्यंत पाणी पोहोचले होते. अशा परिस्थितीतदेखील नागरिकांनी आपल्या घरातच राहणे पसंत केले. रात्री पाण्याची पातळी वाढण्याचा धोका असल्याने अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने या नागरिकांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या नागरिकांनी आपले घर सोडण्यास नकार दिला. पुराच्या वेळेस घर सोडल्यास घरातील सामानाची चोरी होते, या भीतीपोटी नागरिकांनी घरातच राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हतबल झालेल्या नागरिकांना गुडघाभर पाण्यातच रात्र काढण्याची वेळ आली होती.
अशीच काहीशी परिस्थिती नालंदानगर आणि कमलाकरनगर परिसरात निर्माण झाली होती. अनेक चाळीतील घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू होता. मात्र, पावसाचा जोर ओसरत नसल्याने या भागातील नागरिकांनादेखील गुडघाभर पाण्यातच रात्र काढण्याची वेळ आली होती.