अंबरनाथ: १७ जून पासून सर्वच शाळा सुरू झाला. शाळा भरण्याच्या दिवशी शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. पश्चिम भागात सात ते आठ मोठ्या शाळा आहेत त्या शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरच सर्वाधिक वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीमुळे शाळेच्या बस वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. ही सर्व वाहतूककोंडी केवळ पोलीस स्टेशन चौकात होत असल्याने यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी होत आहे.अंबरनाथ शहरातील वाहतूक कोंडी सर्वांनाच त्रासदायक ठरते आहे. ही सर्व कोंडी एकाच रस्त्यावर होत असल्याने येथे वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरल्याचे दिसते. दुपारी १२ ते २ च्या दरम्यान ही कोंडी सर्वाधिक असल्याने त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होऊनही तेथील कोंडी मात्र अजूनही फुटलेली नाही.कल्याण-बदलापूर रस्त्यावरील नगरपरिषद चौक, पोलीस स्टेशन चौक आणि विम्को नाका चौक सातत्याने कोंडीत सापडत आहे. शाळेची वेळ असो वा नसो, या ठिकाणी कोंडी मात्र कायम आहे. या कोंडीवर लक्ष केंद्रित करुन त्यावर उपाय योजना करण्याची गरज आहे. मात्र या रस्त्यावरील बेकायदेशीर वाहन पार्र्किं ग, दुकानदारांचे अतिक्रमण, पोलीस स्टेशन बाहेरील वाहने हे अडचणीचे मुद्दे ठरत आहेत. मात्र त्यावर कोणतेच उपाय आखले जात नाहीत. सोमवारी दुपारी १२ वाजता पुन्हा याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शाळा भरण्याची आणि सकाळच्या सत्रातील शाळा सुटण्याची वेळ असल्याने ही कोंडी सर्वाधिक झाली.अनेक शाळांचा आज पहिला दिवस असल्याने त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी उशीरा जाण्याची वेळ आली. या कोंडीत अडकलेल्या शाळेच्या बस बाहेर काढण्याकडेही योग्य लक्ष दिले जात नाही. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका शाळेला बसतो आहे. दुसरीकडे या रस्त्यावर कोंडी वाढत असल्याने आता पर्यायी रस्त्यांचा शोध घेत वाहन चालक मार्ग बदलण्याचे काम करताना दिसतात.
वाहतूककोंडीने अंबरनाथकर झाले पुरते हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:01 AM