लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : येथील एका पिळदार शरीरयष्टी असलेल्या सिलिंडर मॅनचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सागर जाधव असे या सिलिंडर मॅनचे नाव असून, सिलिंडर डिलिव्हरी करणारा सागर हा आता रातोरात स्टार झाला आहे. शहरात सागरचे मोठे कौतुक होत आहे.
३० किलोचा सिलिंडर उचलायचा, मग आपण ४५ किलोचे असून कसे चालेल? हे वाक्य आहे सागर याचे. याच जिद्दीतून सागरने गेल्या दोन ते तीन वर्षात मेहनत करून अतिशय पिळदार शरीरयष्टी कमावली. त्यामुळे खांद्यावर सिलिंडर घेतलेला सागर हा जणू बाहुबलीच भासू लागला. सागर हा राणू गॅस एजन्सीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. दोन दिवसांपूर्वी सागर हा अंबरनाथ स्टेशन परिसरात सिलिंडरच्या गाडीजवळ उभा असताना अंबरनाथच्याच तुषार भामरे या तरुणाने त्याची पर्सनॅलिटी पाहून त्याचे फोटो काढले आणि सागरच्या नकळत सोशल मीडियावर टाकले. अगदी सहज म्हणून हे फोटो तुषारने टाकले आणि हे फोटो तुफान व्हायरल झाले. अगदी वेबसिरीजच्या कास्टिंग डायरेक्टरपासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनीच सागरच्या या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले.
सागर हा मूळचा नाशिक जिल्ह्यातला. १२ वी पर्यंत शिकलेल्या सागरचे बालपण आणि शिक्षण नाशिक जिल्ह्यातच झाले. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या सागरने १२ वी नंतर अंबरनाथला काका -काकूंकडे येऊन नोकरीचा शोध सुरू केला. तो राहत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरातच भारत गॅस कंपनीचे गोडाउन आहे. याच ठिकाणी १२ वर्षांपासून तो नोकरी करत आहे. आधी अतिशय सडपातळ असलेल्या सागरला ३० किलोचा सिलिंडर उचलायचा तर आपण ४५ किलोचे असून कसे चालेल? असा प्रश्न पडला आणि त्याने तीन वर्षांपासूनच जीममध्ये जाऊन शरीरयष्टी कमवायला सुरुवात केली.
----------------------------------------------------------
आयुष्य बदलेले स्वप्नातही वाटले नाही
सागरच्या घरी त्याचे काका-काकू, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे. अतिशय मेहनत करून तो घर चालवतो. आयुष्य एका रेषेत चालले असताना अचानक असे काही तरी होईल आणि आयुष्य रातोरात इतके बदलेल, असं स्वप्नातही वाटले नव्हते, असे सागर नम्रपणे सांगतो.