अंबरनाथ: गेल्या 24 तासात झालेला मुसळधार पावसात शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यातच अंबरनाथ पूर्व भागातील मुख्य नाला धोकादायक स्थितीत असल्याने या नाल्याने रेल्वे रुळाला देखील आपल्या मगर मिठीत घेतले आहे. या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह एवढा जास्त होता की अंबरनाथ आणि बदलापूर या दोन रेल्वे स्थानकांच्या मध्यावर असलेल्या रेल्वे रुळाखालील खडी देखील वाहून गेली आहे. हा रेल्वे मार्ग धोकादायक झाल्याने या ठिकाणची अप आणि डाऊन दिशेकडील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.
सकाळी दहा वाजताच्या दरम्यान अंबरनाथ शहरातील सर्वच नाले भरून वाहू लागल्याने या नाल्याच्या पाण्याचा प्रवाह रेल्वे रुळावर आला होता. या पाण्याच्या प्रवाहात रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली आले होते. सुरुवातीला अर्धा तास रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली. मात्र त्यानंतर बदलापूर होऊन मुंबईच्या दिशेने एक लोकल सोडण्यात आली. ही लोकल गेल्यानंतर पुन्हा एकही लोकल अप किंवा डाऊन दिशेने सोडण्यात आली नाही.
अंबरनाथच्या बी केबिन परिसरातील मुख्य नाल्याने रेल्वे रुळाखालील खडी देखील वाहून नेल्याने हा रेल्वे मार्ग धोकादायक झाला होता. सकाळी 11 पासून दुपारी दोन वाजेपर्यंत एकही लोकल अथवा एक्सप्रेस गाडी सोडण्यात आली नाही. पावसाचा पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट अधिकारी बघत होते. रेल्वे रुळाखालील वाहून गेलेली खडी पूर्ववत करण्यासाठी 30 ते 40 कर्मचारी देखील बोलावण्यात आले होते.
मात्र पावसाचा प्रवाह कमी होत नसल्याने या कर्मचाऱ्यांना देखील पावसाच्या विश्रांतीची वाट पहावी लागली. रेल्वे रुळाखालील संपूर्ण खडी नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने अधिकाऱ्यांनी देखील या रेल्वे रुळाखालील पाण्याची पातळी तपासून युद्ध पातळीवर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र गेल्या तीन तासापासून रेल्वे सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
रेल्वे रुळावर पाणी साचण्याचा प्रकार अंबरनाथच्या मोरीवली गाव परिसरात देखील घडला असून त्या ठिकाणी देखील नाले भरून वाहत असल्यामुळे संपूर्ण पाणी रेल्वे रुळावर आले होते. बदलापुरातील प्रवाशांना मुंबई दिशेकडे एकही लोकल सोडण्यात आली नाही.