धरणाची सुरक्षा रामभरोसे
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथमधील रेल्वेचे जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा बनले असून, या धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे. या धरणाशेजारीच मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर असून, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा यांचा खच पडलेला आहे.
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी भागातील काकोळे गावाशेजारी रेल्वेने २०० वर्षांपूर्वी धरण बांधले होते. त्या वेळच्या ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या नावाने म्हणजेच जीआयपी या नावाने हे धरण ओळखले जाऊ लागले. याच धरणातून कोळशाच्या इंजिनांना लागणारे पाणी वाहून नेले जात होते. मात्र, कोळशाचे इंजिन बंद झाल्यानंतर अनेक वर्षे हे धरण दुर्लक्षित होते. लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी या धरणाशेजारी रेल नीरचा कारखाना उभारला आणि हे धरण पुन्हा उपयोगात आले. मात्र, हे धरण शहरापासून जवळ असल्यामुळे या धरणावर दररोज अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या भागांतून नागरिक मोठ्या संख्येने येत असतात, तर मद्यपींचाही मुक्तसंचार धरणाच्या परिसरात असल्याचे उघड झाले आहे. अनेक जण धरणात आंघोळ करण्यासाठी तसेच गाड्या धुण्यासाठीही येतात. या धरणाच्या आजूबाजूला मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळतो, तर निर्माल्य आणि अन्य कचराही मोठ्या प्रमाणात धरणाच्या आजूबाजूला पडलेला असतो.
पावसाळ्यात हा सगळा कचरा धरणात वाहून येतो आणि अखेर हेच पाणी रेल्वेच्या प्रकल्पातून प्रवाशांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे या धरणाची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. मात्र, असे असतानाही धरणावर रेल्वेकडून एकही सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. मद्यपी बिनधास्त धरणाच्या परिसरात उच्छाद घालत असतात. धरणाच्या आजूबाजूला तर अक्षरश: एखाद्या दारूच्या अड्ड्यासारखी परिस्थिती असते. त्यामुळे रेल्वेने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत काकोळे गावचे उपसरपंच नरेश गायकर यांनीही रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, तरीही रेल्वेकडून या धरणाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच रेल्वेला जाग येणार का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.