अंबरनाथ : जूनच्या पहिल्या आठवड्यात शहरातील नालेसफाई पूर्ण होणे अपेक्षित असताना अंबरनाथ नगरपालिका मात्र निद्रावस्थेत असल्याचे दिसत आहे. मे महिना संपत आला तरी नगरपालिकेची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे यंदाची नालेसफाई ही केवळ दिखाव्यापुरतीच करण्यात येणार हे निश्चित मानले जात आहे. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निविदा उशिरा काढण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.
अंबरनाथ शहरातील अनेक वस्त्या या शहरातील मोठ्या नाल्यांच्या शेजारी आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे आणि ती वेळेवर पूर्ण करून घेणे ही पालिकेची जबाबदारी आहे. अंबरनाथ नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने सर्व अधिकार प्रशासनाला असल्याने यात लोकप्रतिनिधींचा कोणताही हस्तक्षेप होत नाही. प्रशासनाला पूर्ण मुभा असतानाही पालिका प्रशासनाने नालेसफाईची निविदा उशिरा काढली आहे. मुळात शहरातील नालेसफाई मे महिन्यातच पूर्ण करून जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व नाले स्वच्छ करून ठेवणे अपेक्षित होते. मात्र अंबरनाथ नगरपालिकेने नालेसफाईची निविदा प्रक्रिया उशिरा केल्याने शहरातील नालेसफाईचे काम रखडले आहे. जे काम मे महिन्यात करणे अपेक्षित होते, त्या कामाची निविदा मे महिन्यात काढल्याने पालिका प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
दोन वर्षांपासून अंबरनाथ नगरपालिका नालेसफाई करताना यंत्रसामग्री आणि नालेसफाईसाठी वापरण्यात येणाऱ्या कामगारांचे जे वार्षिक दर मंजूर करण्यात आले आहेत त्याच दरानुसार ठेकेदाराकडून काम करून घेत होते. नालेसफाईसाठी लागणारी यंत्रसामग्री आणि कामगार वार्षिक दरानुसार घेऊन लागलीच काम पूर्ण करून जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व काम करून घेत होती. यंदा कोरोनाचे सावट असताना आणि पालिका प्रशासन कोरोनावर उपाययोजना करण्यात व्यग्र असताना नालेसफाईची निविदा प्रक्रिया वेळेवर झाली नाही. या सर्व गोंधळात यंदाची नालेसफाई ही केवळ पालिकेच्या तिजोरीची सफाई करणार हे स्पष्ट झाले आहे.
निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की
काेराेना संकटामुळे निविदा प्रक्रिया वेळेवर न झाल्याने वार्षिक दरानुसार काम करणे अपेक्षित आहे. मात्र पालिकेने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निविदा प्रक्रिया केली. त्यातच निविदा प्रक्रियेदरम्यान दोनच निविदा आल्याने नाइलाजास्तव या निविदेला मुदतवाढ देण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर आली. त्यामुळे नालेसफाईची निविदाही रखडली.
------------------