लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या सहा महिन्यांपूर्वीच सादर केलेल्या नाट्यगृहाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. या नाट्यगृहासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत सहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पासाठी ८ कोटी २५ लाख खर्च असून उर्वरित २ कोटी २५ लाखाची आर्थिक तरतूद पालिका करणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेने आरक्षण क्रमांक ९८ मध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या नाट्यगृहाचा सविस्तर अहवालही तयार करण्यात आला. आरक्षित भूखंडापैकी १. ८७ एकर जागा ही या नाट्यगृहासाठी संरक्षित ठेवली. या जागेवर तळ अधिक एक मजल्याचे असे नाट्यगृह उभारण्याचा विषय मंजूर झाला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे निधीसाठी पाठविला आहे. महाराष्ट्र नगरोत्थान महाअभियान अंतर्गत जिल्हा नियोजन समितीने आपल्या जिल्हा वार्षिक योजनेत या प्रकल्पासाठी ६ कोटीच्या निधीची तरतूद केली आहे. या निधीमुळे नाट्यगृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी या नाट्यगृहाच्या प्रस्तावासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून प्रकल्पाच्या एकूण निधीपैकी उर्वरित निधीची तरतूद पालिका प्रशासन करणार आहे. या नाट्यगृहात ३७८ सीटचे बंदिस्त नाट्यगृहासोबत पहिल्या मजल्यावर १३० सीटचे सभागृह उभारण्यात येणार आहे. तर या नाट्यगृहात नाट्यकलाकारांना तयारी करण्यासाठी दोन रूम, क्राय रुम, स्वच्छतागृह, किचन आणि बुकींग रूम तयार करण्यात येणार आहे. तळमजल्यावर २३ हजार चौरस फुटांचे नाट्यगृह उभारले जाणार असून वरच्या मजल्यावर ६९२ चौरसफुटांचे सभागृह उभारले जाणार आहे. हा निधी पालिकेकडे वर्ग झाल्यावर लागलीच नाट्यगृहाच्या कामाच्या निविदा प्रक्रियाचे काम सुरू होणार आहे.
अंबरनाथच्या नाट्यगृहाला अखेर हिरवा कंदील
By admin | Published: May 11, 2017 1:52 AM