लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मध्य रेल्वेवरील जंक्शन असलेल्या कल्याण स्थानकात रुग्णवाहिका नसल्याने रेल्वे प्रवासादरम्यान अपघात झालेल्या जखमी प्रवाशाला उपचारासाठी रुग्णालयात नेताना रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहेत, तसेच अत्यावश्यक उपचार केंद्रही बंद आहे. त्यामुळे जखमी प्रवाशाचा जीव वाचणार कसा, असा प्रश्न प्रवासी संघटना विचारत आहेत.
कल्याण स्थानकातून उपनगरी लोकल, तसेच उत्तर व दक्षिण भारतात ये-जा करणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या थांबतात. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या जवळपास साडेतीन लाख आहे. रेल्वे प्रवासात अथवा कल्याण स्थानकात एखाद्या प्रवाशाचा अपघात झाल्यास त्याला रुग्णालयात नेण्यासाठी स्थानकात रुग्णवाहिका नाही, तसेच एम्स रुग्णालयाने माफक दरात सुरू केलेले अत्यावश्यक उपचार केंद्रही बंद आहे. त्यामुळे जखमी प्रवाशाला रुग्णालयात नेण्यासाठी रेल्वे पोलिसांना स्वखर्चातून रुग्णवाहिका करावी लागत आहे. त्यात रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यास प्रसंगी प्रवाशाचा जीव जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत कल्याण ते कसारा आणि कल्याण ते बदलापूरदरम्यानची १६ स्थानके येतात. या स्थानकांदरम्यान एखाद्याचा अपघात झाल्यास त्याला उपचारासाठी कल्याणला आणणे हे अत्यंत जिकरीचे असते. यापूर्वी कल्याण स्थानकात रुग्णवाहिकेची सेवा होती. मात्र, रुग्णवाहिकेच्या इंधनाचा खर्च आणि चालकाचा पगार कोण देणार, या प्रश्नामुळे ही सेवा बंद पडली आहे. दरम्यान, रुग्णवाहिका सेवा रेल्वेने देणे आवश्यक आहे, तसेच या मोठ्या स्थानकात उपचार केंद्रही सुरू असणे आवश्यक असल्याचे मत कल्याण रेल्वे पोलिसांनी व्यक्त केले आहे.
--------------
रेल्वेस्थानकात रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक उपचार केंद्राची सेवा उपलब्ध करून देणे ही रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. न्यायालयाचे तसे आदेश आहेत. मात्र, कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत स्थानकांत रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रवासी संघटना पाठपुरावा करत असतात. काही स्थानकांत ही सेवा नाही. मुळात कल्याण स्थानकात ही सेवा नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
-मनोहर शेलार, संस्थापकीय अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ
-------------------------------