मीरारोड - कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी परवानगी असणाऱ्यां व्यतिरिक्त कोणी बाहेर फिरू नये असे सतत आवाहन करून देखील अनेक बेशिस्त व बेजबाबदार लोक सर्रास बाहेर फिरत आहेत. पोलिसांनी बेजबाबदारांना लगाम घालण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. परंतु भाईंदर पश्चिमेस उड्डाण पुलाखाली लावलेल्या नाकाबंदी मुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने त्यात रुग्णवाहिका अडकून पडल्याचे प्रकार घडले.
मीरा भाईंदर शहरात कोरोना संसर्ग आणखी पसरू नये म्हणून परवानगी नसलेल्या लोकांनी बाहेर पडू नका असे सातत्याने सांगून देखील बेजबाबदार लोक मात्र ऐकण्यास तयार नाहीत . जेणे करून कोरोना संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे कारणा शिवाय बाहेर पडणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी रन तपासणी सुरू केली आहे. काही ठिकाणी रस्ते बंद केले आहेत. परंतु कारणाशिवाय बाहेर फिरणाऱ्या मुजोरां मुळे वाहतुकीची कोंडी होऊन त्याचा फटका रुग्णवाहिकांचा सुद्धा बसत आहे. भाईंदर पश्चिमेस उतरणाऱ्या उड्डाणपुला खाली पोलिसांनी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी गुरुवारी काटेकोरपणे करायला सुरुवात केली. पूर्व - पश्चिम जोडणारा हा उड्डाणपूल मुख्य मार्ग असल्याने तपासणी मुळे वाहनांची लांब रांग लागून वाहनकोंडी झाली.
वाहन कोंडीत पश्चिमेला येणाऱ्या रुग्णवाहिका अडकून पडल्या. उड्डाणपुलावरील रस्त्याच्यामध्ये दुभाजक असल्याने तसेच हा एकेरी मार्ग असल्याने रुग्णवाहिकांना मार्ग काढणे अवघड झाले. जेणेकरून काही रुग्णवाहिकेत रुग्ण सुद्धा कोंडीत अडकून पडल्याने विलंब झाल्यास रुग्णाची प्रकृती बिघडण्याची भीती निर्माण झाली. जागरूक नागरिक व पोलिस अडकलेल्या रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत वाट मोकळी करून देत होते. परंतु वाहनकोंडीमुळे रुग्णवाहिकांना मार्ग काढणे अवघड झाले होते. अखेर पोलिसांनी काहीकाळ तपासणी थांबवत वाहनांची कोंडी दूर करत रुग्णवाहिका वाटेला लावल्या. यापुढे रुग्णवाहिकेची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेत नाकाबंदी व तपासणी केली जाणार आहे.