भिवंडी: आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. या गाण्यातील बाल कलाकार बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे, हा या गाण्यामुळे घरोघरी पोहोचला मात्र, या गाण्याचे मूळ गायक व गीतकार भिवंडीतील असून हे कलाकार आजही प्रसिद्धीपासून दूर आहेत.
भिवंडी शहरालगतच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील चरणी पाडा अंजूर फाटा येथे राहणारे मनोज घोरपडे हे या गाण्याचे गीतकार असून त्याचा चिमुकला मुलगा मोहित उर्फ माऊली व मुलगी शौर्य हे दोघे या गाण्याचे गायक आहेत. घोरपडे कुटुंबीयांचा वडापावचा व्यवसाय असून गीतकार मनोज हा त्यांचे वडील अनिल घोरपडे यांच्या वडापावच्या गाडीवर वडिलांना मदत करून गाण्याचा छंद जोपासतो.
मागील चार वर्षांपूर्वी मनोजने आमच्या पप्पांनी गणपती आणला हे गाणे लिहिले होते. हे गाणं लहान मुलांच्या आवाजात चांगले वाटेल म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांकडूनच सराव करून घेत हे गाणं २०२२ मध्ये गाऊन घेतले होते.सुरुवातीला या गाण्याला सोशल मीडियावर दोन मिलियन व्ह्यूवज मिळाले होते. परंतु बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे याने या गाण्यावरील व्हिडिओ बनवल्यानंतर हे गाणे प्रचंड व्हायरल झाले.
सध्या या गाण्याला साडेसहा मिलियन व्हूज मिळाले असून चिमुकला कलाकार साइराज हा चांगलाच प्रसिद्धी झोतात आला आहे.मात्र या गाण्याचे गीतकार व मूळ गायक गायक मात्र प्रसिद्धीपासून दूर आहेत मात्र तरीही गाणे सर्वत्र व्हायरल झाल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया गीतकार मनोज घोरपडे यांनी दिली आहे.
या गाण्यामुळे मनोजचा हुरूप वाढला असून नवरात्रीत आपल्या चिमुकल्या शौर्या कडून त्यांनी " गरबा नाचायला आली मम्मीच्या संगे ,हे गाणे गाऊन घेतले असून गणपती येणार आमच्या घराला ,दहा दिवसांची मजा करायला हे गाणे मुलगा मोहित उर्फ माऊली व मुलगी शौर्य व भाचा हृदय बुरुड यांच्या आवाजात गाऊन घेतलेले असून हे नवे गाणे या गणपती सणाच्या आधी प्रकाशित करणार असून ते गाणे देखील पहिल्या गणपती गाण्यासारखेच सर्वांच्या आवडीचे होईल असा विश्वास मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला आहे.