- सुरेश लोखंडे ठाणे : मुंबईची तहान भागवून स्वत: टंचाईला तोंड देणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जगभरातील २३ देशात आंबा, चिकू, सीताफळ या फळांसह भेंडी, कारली, मिरची, दुधी भोपळा हा भाजीपाला आणि फूल व फळझाडे निर्यात केली आहेत. गेल्या वर्षभरात तीन कोटी रुपये किमतीची ४७३ मेट्रिक टन फळे, भाजीपाला आणि फळफुलांच्या रोपांची निर्यात केली. शहरी जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचा कृषी माल आता परदेशात भाव खात आहे.
आतापर्यंत पावसाळी भाताच्या उत्पादनावर आणि मच्छीमारीच्या व्यवसायात समाधान मानणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल परदेशात उत्तम भाव ‘खात’ आहे. खरिपाच्या भात या एका पिकावर शेतकरी अवलंबून होता. मात्र कृषी विभागाचा सततचा पाठपुरावा, शेतकऱ्यांमधील जनजागृती याची किमया साधून शेतकरी वर्षाकाठी तीन कोटींची उलाढाल करीत आहेत. कृषी माल निर्यात या धोरणाखाली जिल्ह्यातील कृषी अधिकारी आणि पणन विभागाने सागरी, नागरी, डोंगरी आदी दुर्गम भागातील शेती मालाला परदेशात बाजारपेठ उपलब्ध केली आहे.
जिल्ह्यातील शेतकरी सध्या समूह शेतीच्या माध्यमातून कृषी उत्पादनावर लक्ष केंद्रित करीत आहे. जिल्ह्यातील हा कृषी माल युनायटेड किंग्डम, यूएसए, न्यूझिलंड, संयुक्त अरब अमिरात, स्पेन, जर्मनी, जपान आदी देशांच्या बरोबरच थायलंड, ओमन, कतार, मॉरिशस, केनिया, इटली, फ्रान्स, इंडोनेशिया, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया आदी देशातील बाजारपेठेत विक्रीला जात आहे. त्यापोटी वर्षभरात तीन कोटी रुपये उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी दिली. अन्नधान्यात मका, फळे, भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे, घरातील शोभेच्या वनस्पती आदी ४७२.७३ मेट्रिक टन कृषी माल व रोपांची निर्यात तब्बल ४३७ प्रमाणपत्राद्वारे करण्यात आली. या निर्यातीसाठी ४६३ प्रमाणपत्रे निश्चित केली होती. मात्र त्यापैकी २६ प्रमाणपत्राद्वारे होणारी निर्यात ऐनवेळी रद्द झाली. यामध्ये आयरलँडकडून नऊ ऑर्डर, तर युनायटेड किंग्डमने दहा, यूएसएने दोन ऑर्डर रद्द केल्या.
परदेशात पुरवठा झालेल्यांमध्ये आंबा, चिकू, डाळिंब, सीताफळ, फणस, काकडी याचा समावेश आहे. याखेरीज रेगिस्तानी गुलाब, घरातील व टेरेसच्या सजावटीचे, हवा शुद्धीकरणाची रोपटी, भाजीपाल्यामध्ये वांगी, कारली, भेंडी, दुधीभोपळा, आलं, लसूण आणि अन्नधान्यात मका आदी ३२ लाख ६३ हजार ४९९ नगांचा पुरवठा गेल्या वर्षभरात विमान, जहाजांद्वारे सातासमुद्रापार नेले आहे.