ठाणे : ठाणे शहरात रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला. या तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्यांदाच भारतात खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली. यावेळी अमेरिकन कंपनीचे प्रतिनिधी विल्फे्रड जो, क्रि स जिगलर, डेव्हिड लाइटफूट तसेच पीजीके इंटरनॅशनल या कंपनीचे गुल कृपलानी आदी उपस्थित होते.अॅग्रीबाइंड नावाचे हे रसायन अमेरिकेत रस्ते, सिमेंट काँक्रिटच्या मजबुतीसाठी, इरिगेशन चॅनल्स बनवण्यासाठी तसेच खड्डे भरण्यासाठी वापरले जाते. द्रव्यस्वरूपातील पॉलिसरसदृश हे रसायन खडीमध्ये मिसळून रस्ते तसेच खड्डे भरण्यासाठी वापरल्यास कमीतकमी पाच वर्षांपर्यंत रस्ते टिकू शकतात. सदरचे रसायन हे घातक, ज्वलनशील, स्फोटक नसून वापरण्यासाठी पर्यावरणाभिमुख आहे. त्यामुळे या रसायनाचा वापर करून सुरुवातीला स्वर्गीय मीनाताई ठाकरे चौक, नागरी संशोधन केंद्र रोड या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर वापरून खड्डे भरण्यात येणार आहेत. त्यानंतर, त्याची पडताळणी करून भविष्यात इतर रस्ते बांधण्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल, याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या बैठकीला नगरअभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर, मोहन कलाल, चेतन पटेल आदी अधिकारी उपस्थित होते.
ठाण्यात खड्ड्यांवर आता अमेरिकन तंत्रज्ञानाचा मुलामा; भारतातील पहिलाच प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 12:11 AM