ठाणे : पैशांचे आमिष दाखवून तरुणींना शरीरविक्रयास लावणा-या तबस्सुम खान (३४) या महिलेसह दलाल हानिफ शेख (५४) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्यांना १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले असून त्यांच्या ताब्यातून दोन तरुणींसह तिघींची सुटका केली आहे.पैशांचे तसेच विवाह जुळवण्याचे आमिष दाखवून तरुणींना एक दलाल शरीरविक्रयास भाग पाडत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे दौंडकर यांच्यासह उपनिरीक्षक कल्याणी पाटील, जमादार राजू महाले, नाईक नीशा कारंडे, हंशिता मिसाळ, बेबी म्हशाळ आणि हवालदार अविनाश बाबरेकर आदींच्या पथकाने शनिवारी दुपारी हानिफ या दलालाला संपर्क केला. तेव्हा, त्याने २५ हजारांमध्ये एका मुलीसाठी ‘सौदा’ होईल, असे पोलिसांच्या बनावट गि-हाइकाला सांगितले. पोलिसांनी २५ हजारांची जमवाजमव करून दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या जांभळीनाका येथील ‘हॉटेल सरोवर’ येथे हानिफने सांगितल्याप्रमाणे सापळा लावला. तेव्हा तिथे त्याच्याबरोबर एक महिला आणि तबस्सुम या महिलेबरोबर दोन तरुणी आल्या होत्या. त्यांच्यापैकी एकीला या गि-हाइकाने नेतानाच पोलिसांना सांकेतिक भाषेत इशारा केला, त्याच वेळी पोलिसांच्या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकून या तिघींची सुटका केली. तसेच तबस्सुम आणि हानिफ या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध अनैतिक व्यापार अधिनियमासह कलम ३७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ए.जी. कुंभार याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.लग्न जुळवण्याच्या नावाखाली...हानिफ हा लग्न जुळवण्याची कामे करत असल्याची माहिती पोलिसांनी सुटका केलेल्या एका घटस्फोटित महिलेला मिळाली. त्यानुसार, तिने हानिफला दुस-या लग्नाचा विचार बोलून दाखवला. दोन लहान मुलांची जबाबदारी आणि आर्थिक चणचणीमुळे आपण चांगल्या उपवर मुलाच्या शोधात असल्याचेही तिने सांगितले. तेव्हा पैशांचे आमिष दाखवून तिला शरीरविक्रयासाठी त्याने गळ घातली. त्याबदल्यात तिला १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्याने मात्र तिच्यासाठी २५ हजारांमध्ये ‘सौदा’ केला. पहिल्यांदाच ती या कामासाठी तयार झाली आणि वाममार्गाला लागण्यापूर्वीच पोलिसांनी तिची सुटका केली.सुटका झालेल्या अन्य दोन मुलींना तबस्सुमने शरीरविक्रयाच्या बदल्यात प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवले. हानिफकडून मात्र एकीच्या बदल्यात पाच हजार रुपये तिने घेतले. पुढे हानिफ त्यांचा चढ्या दराने ‘सौदा’ करणार होता, त्याच वेळी पोलिसांनी त्यांचीही सुटका केली. या मुलींवर यापूर्वीही लैंगिक अत्याचार झाल्याचे तपासात उघड झाले आहे.