ठाणे - देशात अन् राज्यातील कोरोनाच्या लढाईत बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वचजण आपलं योगदान देत आहेत. कुणी भुकेल्यांना अन्न देऊन, कुणी मजुरांना गावी पोहोचवून तर कुणी मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे जमा करुन, पंतप्रधान केअर फंडात निधी देऊन कोरोनाविरुद्ध दोनहोत करताना खारीचा वाटा उचलत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यापूर्वी आपल्या भाषणात चिकुल्यांनी त्यांच्या बर्थडेचे पैसे सहायता निधीत दिल्याने कौतुक केले होते. आता, ठाण्यातील ४ वर्षांच्या मुक्ताईनेही तिचा वाढदिवस साजरा न करता, ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली. पालकमंत्री शिंदे यांनी मुक्ताई व तिच्या वडिलांच्या निर्णयाचे कौतुक करत मुक्ताईला शुभेच्छा दिल्या.
कोरोनाच्या लढाईविरोधात खारीचा वाटा मुलगी मुक्ताई हिच्या चौथ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुक्ताई गारमेंट्स, करमाळाच्यावतीने मुक्ताईचे वडिल, गारमेंटचे संचालक मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 हजार 4 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे आणि ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला. कोरोना संकटात, लॉकडाऊनमधील दयनीय परिस्थीतीत अनेकांचे हाल पाहून मन सुन्न होत आहे. गावाकडे पायी जाणाऱ्या मुजरांची दुर्दशा पाहिल्यानंतर डोळे पाणावल्याशिवाय राहत नाही. वैद्यकीय क्षेत्रात जवळून काम करताना, मी गेली कित्येक दिवस सेलिब्रेशन हा शब्दच विसरलोय. आनंद असेल तो केवळ रुग्ण बरा झाल्याचा, एखाद्याला मदत मिळवून दिल्याचा. त्यामुळेच, या संकटकाळात आपण लेक मुक्ताईचा वाढदिवस घरात साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच, वाढदिवसासाठी खर्च होणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा केली, असे मुक्ताईचे वडिल मंगेश चिवटे यांनी म्हटले.
दरम्यान, मंगेश चिवटे हे संवेदनशील असून नेहमीच समाजकार्यात हिरिरीने सहभाग घेतात. यापूर्वी, गेल्या महिन्यात मंगेश चिवटे यांचे वडील तथा मुक्ताई गारमेंट्सचे प्रोपायटर नरसिंह मनोहरपंत चिवटे यांनीही 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 25 हजार 80 रुपयांचा धनादेश करमाळा तहसीलदार माने यांच्याकडे सुपूर्द केला होता. नरसिंह चिवटे हे स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेचे प्रांतिक सदस्य असून महाराष्ट्र राज्य खते - बी बियाणे संघटनेचे माजी उपाध्यक्ष आहेत.