ठाणे : वागळे इस्टेट येथील एमी लाइफ सायन्स या कंपनीने अमराठी तरुणांना नोकरी देणार असल्याची जाहिरात प्रसिद्ध केल्याने मनसेचे कार्यकर्ते ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी कंपनीवर धडकले. मनसेने या जाहिरातीबाबत जाब विचारल्यावर कंपनी व्यवस्थापनाने जाहीर माफी मागून मराठी मुलांनाच नोकरी देणार असल्याची कबुली मनसैनिकांना दिली. या कंपनीत १०० टक्के मराठी मुलांची भरती केल्यास संचालकांचा आम्ही पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करणार असल्याचे मनसेने जाहीर केले.
वागळे इस्टेट, निटको बिझनेस पार्क येथील एमी लाइफ सायन्स या कंपनीने भरतीसंदर्भात दिलेल्या जाहिरातीत कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर अमराठी मुलांना प्राधान्य दिले जाणार, असे लिहिले होते. ही माहिती मनसेचे मोरे यांना कळताच त्यांनी कंपनीवर धडक देऊन व्यवस्थापनाला जाब विचारला. त्यानंतर कंपनीचे संचालक निखिल देडिया यांनी मनसेची माफी मागत पुन्हा अशी चूक घडणार नाही व मराठी तरुणांनाच नोकरीत प्राधान्य दिले जाईल, असे मोरे यांना लिहून दिले.
तर संबंधित जाहिरात ही बडोदा येथून प्रसिद्ध झाली आहे. महाराष्ट्रातून जाहिरात दिली गेलेली नाही. याबद्दल येथील कार्यालयास काहीच कल्पना नव्हती. आम्ही मुंबई कार्यालयात असतो. मुळात मराठी-अमराठी हा भेदभाव स्वतःला मान्य नाही. ही जाहिरात मागे घेतली आहे. यापुढे आमच्या कंपनीत मराठी मुलांना प्राधान्य दिले जाईल, असे देडिया यांनी सांगितले.