सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना ब्लॅकमेलिंग करणारी अनिक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेले जयसिंगानी हे नेहमी पोलिस संरक्षणात फिरायचे. गेल्या आठ वर्षांपासून विविध गुन्ह्यांप्रकरणी ते फरार आरोपी आहेत. पोलिस किंवा अन्य कोणी त्यांच्या घरी गेल्यास, त्याच्या अंगावर जयसिंघानी कुत्रे सोडत असत.
जयसिंघानी हे सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर दोनवेळा नगरसेवकपदाची निवडणूक लढविली होती. २००२ मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी तत्कालीन आमदार पप्पू कलानी यांची तुरुंगामधून मुक्तता झाल्यावर शहरातील वातावरण कलानीमय झाले होते. ‘राष्ट्रवादी‘ला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले. कलानी लाटेत जयसिंघानी हे ‘राष्ट्रवादी‘कडून नगरसेवकपदी निवडून आले होते.
महागडे कुत्रे चर्चेत
क्रिकेट बुकी असल्याने नेहमी पोलिस संरक्षणात वावरणाऱ्या जयसिंघानी यांच्याकडे महागडे कुत्रे होते. पोलिस किंवा अन्य कोणी त्यांच्या घरी गेल्यास, त्याच्या अंगावर जयसिंघानी कुत्रे सोडून देत. त्यामुळे पोलिसही त्यांच्या घरी जायला घाबरत.
वरिष्ठ राजकीय नेत्यांसोबत ऊठबस असलेले जयसिंघानी नगरसेवकपदी असताना क्रिकेट सट्टा प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या घरी छापा टाकून गुन्हे दाखल केल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून जयसिंघानी वादात राहिले. त्यांचे वडील अर्जुन जयसिंघानी यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस सांगतात. अनिल हे गेल्या आठ वर्षांपासून विविध गुन्ह्याप्रकरणी फरार आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"