डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे २७ गावांसाठी १९४ कोटी रुपयांचा निधी अमृत योजनेअंतर्गत मंजूर झाला आहे. त्यासाठी पाण्याच्या उभारण्यासाठी लागणाऱ्या जागा आणि इतर समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रमोद पाटील यांनी केडीएमसीच्या अधिकाऱ्यांसमवेत गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष कामाचा आढावा शनिवारी घेतला.
त्या योजनेंतर्गत गावांमध्ये तब्बल २८ पाण्याच्या टाक्या आणि १४ सब टाक्या उभारल्या जाणार आहेत. त्यासाठी लागणाऱ्या जागांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी अधिकारी,खाजगी विकासक, जागामालक यांचा आमदार पाटील यांनी समन्वय घालण्याचे आश्वासन।दिले. यावेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी इतर समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थांकडून प्रशासनाला योग्यते सहकार्य केले जाईल असे सांगितले आहे. तर खाजगी विकासक,जागामालकांनी देखील योग्य सहकार्य केडीएमसी अधिकाऱ्यांना केले जाईल असे पाटील यांना सांगितले.
कल्याण ग्रामीण मधील आजदे, सोनारपाडा,डोंबिवली एमआयडीसी, भोपर-देसलेपाडा, उसरघर, कोळे आणि कटाई या गावांमध्ये जागेची पाहणी करत योजनेचा आढावा घेतला आहे.तर उर्वरीत गावांमध्ये पाहणी दौरा देखील लवकरच केला जाणार असल्याचे पाटील म्हणाले.
येत्या दोन वर्षात २७ गावांमध्ये ही योजना कार्यन्वित होणार असून कल्याण डोंबिवली मधील २७ गावांना या योजनेअंतर्गत १०५ एमएलडी पाणी मिळणार आहे.त्यामुळे २७ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.असे केडीएमसीचे अधिकारी राजू पाठक आणि विजय पाटील यांनी सांगितले आहे. जोपर्यंत ही योजना पूर्णपणे कार्यन्वित होत नाही तो पर्यंत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करता येईल का ? याचा सुद्धा आढावा घेतला असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. या आढावा दौऱ्यावेळी पाटील यांच्यासह केडीएमसीचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक, विजय पाटील,मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील, मनसे नगरसेवक प्रभाकर जाधव, केडीएमटी सद्यस प्रसाद माळी, मनसे उपविभाग अध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते.