उल्हासनगर : महापालिका प्रवेशद्वारावर कामगार नेते राधाकृष्ण साठे व सुरक्षा रक्षकात प्रवेश देण्यावरून तू तू मैं मैं झाली. कैलासनगर व गणेशनगर येथील रस्त्याच्या आड येणाऱ्या झोपड्यावरील कारवाई थांबविण्याची मागणी साठे करीत होते.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील कैलासनगर व गणेशनगर मधील रस्त्याच्या आड येणाऱ्या झोपडपट्ट्यावर कारवाई करण्याची कारवाई सुरू झाल्याचा आरोप कामगार नेते राधाकृष्ण साठे यांनी केला. या कारवाईचा जाब महापालिका अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी साठे स्थानिक नागरिकांसह महापालिका प्रवेशद्वारा जवळ आले असता, सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. त्यावेळी त्यांच्यात व सुरक्षारक्षकात तू तू मैं मैं झाली. आपण महापालिका प्रशासनाला झोपडपट्टी वरील कारवाईचा जाब विचारण्यासाठी आलो होतो. शहरात शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण झाले का? मग ऐन उन्हात २० ते २५ वर्षं जुन्या झोपडपट्टीला नोटिसा विना कारवाईची मार्किंग का? महापालिकेने तसा निर्णय घेतला का? आदी प्रश्न विचारणार होतो. त्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आलो होतो. अशी प्रतिक्रिया कामगारनेते साठे यांनी पत्रकारा सोबत बोलतांना दिली.
शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याला बाधित होणाऱ्यां घरांना मार्किंग देण्याचे काम महापालिकेच्या वतीने होत असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता अश्विनी आहुजा यांनी दिली. त्यानुसार कैलासनगर व गणेशनगर येथील रस्त्याचे सर्वेक्षण सुरू असल्याचे संकेत आहुजा यांनी दिले. महापालिका नगररचनाकार व बांधकाम विभागाच्या वतीने शहर विकास आराखड्यात रस्त्याला बाधित होणाऱ्या घरांना मार्किंग दिली जात आहे. याप्रकारने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्ताच मंजूर नसतांना, मार्किंग कश्यासाठी? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे. याबाबत शहर अभियंता प्रशांत साळुंखें यांच्या सोबत संपर्क केला असता झाला नाही. तर काही राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने रस्त्याच्या आड येणाऱ्या घरांना मार्किंग देऊन, त्यांच्यात भीतीचें वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.