नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: २०२२ मध्ये महावितरणने कायमस्वरूपी खंडित केलेल्या मीटरची जुनी महावितरणची थकबाकी असलेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना सुवर्ण योजना सुरु केली असून या योजनेत कायमस्वरूपी थकबाकी असलेल्या ग्राहकांना शंभर टक्के व्याज माफी होणार आहे,या योजनेचा कालावधी ३१ डिसेंम्बर पर्यंत असणार असून त्यानंतर कायमस्वरूपी थकीत वीज बिल धारकांना कोणताही लाभ मिळणार नसल्याने अशा थकीत ग्राहकांनी या योजनेचा जास्तीत जास्त व लवकर लाभ घ्यावा असे आवाहन टोरंट पावर कंपनिने केले आहे.
शिळ-मुंब्रा कळवा परिसरात सुमारे १ लाख १० हजार ग्राहकांकडे एकूण ३५० कोटी पेक्षा जास्त कायमस्वरूपी खंडित थकबाकी आहे.मात्र येथील सुमारे १६५० ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला आहे.तर भिवंडीत सुमारे ८३ हजार ग्राहकांकडे एकूण ११०० कोटींहून अधिक कायमस्वरूपी खंडित थकबाकी असून आतापर्यंत फक्त सुमारे ११०० ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ३१ डिसेंम्बर पर्यंत या योजनेद्वारे मूळ रकमेवर दहा टक्के सूट तर संपूर्ण व्याज माफी देणारी अशी योजना पुन्हा कधीही येणार नसून त्यांनतर टोरंट पावर वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर नियमांनुसार कठोर कारवाई करेल असा इशाराही टोरंट पावरने दिला आहे.