लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विरोधी पक्षाच्या नेत्याच्या जीवाला धोका निर्माण केला जात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केली.
ठाण्याचे पोलिस कोणत्या मानसिकतेत आहेत, हे समजू शकते, मात्र मी त्यांना दोष देत नाही. परंतु अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे, असे आव्हाड म्हणाले.
उद्धवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर शनिवारी ठाण्यात मनसेच्या ३० ते ३५ जणांनी हल्ला केला. त्यावरून आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आव्हाड यांनी ठाकरे यांच्या मोटारीवर एकजण जवळून काहीतरी फेकत असल्याचा व्हिडीओ पाेस्ट केला आहे. त्यासाेबत त्यांनी, पोलिस अधिकाऱ्यांच्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांचे किती खच्चीकरण केले जात असेल, अशी टिप्पणीही केली आहे. आपला अधिकारीच इतका झुकतो तर आपण का ताठ राहावे, अशी पोलिस दलाची मानसिकता झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान मात्र खाली जातेय. ज्या पोलिस खात्याचे जगभर कौतुक केले जायचे; त्याच्यावर आता ही नामुष्की ओढवली आहे. जे घडले ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
राज ठाकरेंना टोला
तुम्ही काहीही बोललात; कोणाचीही टिंगल-टवाळी केली तरी सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार, सभा उधळून लावण्याची धमकी देणार, माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! पण सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला.