प्रज्ञा म्हात्रेठाणे : कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा वनवासी बांधवांनी आपल्या कल्पकतेतून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ठाण्यात पुन्हा एकदा भरणार आहे. यात बांबू, मातीपासून बनविलेल्या वस्तूंपासून वारली पेंटींग आणि इतर कलाकुसरीच्या वस्तूही ठाणेकरांना पाहायला मिळणार आहे. वनवासी कल्याण आश्रम आयोजित प्रदर्शनाचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे अशी माहिती वनवासी कल्याण आश्रम, ठाणे महानगरच्या सचिव स्वाती जोशी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
वनवासी कल्याण आश्रम, ठाणे महानगर गेली २५ वर्षे वनवासी बांधवांनी तयार केलेल्या विविध कला वस्तूंचे प्रदर्शन भरवत आहे. १५, १६ आणि १७ ऑक्टोबर या कालावधीत ब्राह्मण सेवा संघा, ब्राह्मण सोसायटी, ठाणे (प.) येथे सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत तीन दिवसीय प्रदर्शन असणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रदर्शनाबरोबर विशेष स्मरणिकेचे अनावरण केले जाणार आहे. मुरबाड, शहापूर, वारडा , जव्हार, मोखाडा यांसारख्या महाराष्ट्रातील वनवासी भागांतील बांधव ठाण्यात त्यांच्या कलाकुसरीच्या वस्तू घेऊन दाखल होणार आहेत. त्यांच्या निवास, भोजन आणि स्टॉल्सची व्यवस्था संस्थेकडून करण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने बवनासी बांधवांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असतो. यातून मिळणारा नफा हा पुर्णपणे त्या बांधवांना दिला जातो असेही जोशी यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला संस्थेच्या नीलाक्षी करोडे, अनिल कोल्हटकर, उल्हास कार्ले, शीला वागळे आदी उपस्थित होत्या. यंदाच्या प्रदर्शनाचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने घोडबंदर रोड, ब्रह्मांड, कोलशेत या तीन ठिकाणी एक दिवसीय तीन प्रदर्शने भरविण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. या प्रदर्शनात ३० स्टॉल्स असमार आहेत. मोहाच्या फुलांपासून बनविलेले मणूके, चिकूपासून तयार केलेली विविध उत्पादने, बांबू, मातीच्या सजावटीच्या वस्तू हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असणार आहे. शहरातील नागरिकांना या वस्तू बाराही महिने उपलब्ध व्हाव्या म्हणून कायमस्वरुपी कला केंद्र तयार करण्याचा मानस संस्थेने पत्रकार परिषदेत व्यक्त केला.