ठाणे : काही दिवसांपूर्वी महाविद्यालयात झालेल्या शिवीगाळी आणि बाचाबाचीच्या रागातून विटावा येथील विराज अदक (२७) याच्यावर चाकूने खूनी हल्ला करण्यात आला. तर त्याचा साथीदार वैभव मेंगडे (२७) मारहाण करणाऱ्या कौस्तुभ तुरे (२२) आणि निखील कोळी (२२) या दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. दोन्ही आरोपींना १८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. कळव्यातील विटावा येथील रहिवाशी विराज आणि वैभव तसेच मनोर आणि निखील या चौघांमध्ये पूर्वी झालेला वाद १३ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा उफाळून आला.
यातूनच कौस्तुभ आणि निखील यांनी विराज याच्या मानेवर, छातीवर आणि पोटावर चाकुने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचवेळी वैभव मेंगडे यालाही या दोघांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी विराजचे वडिल शिवाजी आदक (५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळवा पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वाय. जे. शिरसाट यांच्या पथकाने कौस्तुभ आणि निखील या दोघांनाही मंगळवारी रात्री अटक केली.