उल्हासनगर : शहरातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी समाजसेविका हेमा पिंजानी यांनी गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी केले. या गुणगौरव कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थ्यांनी पालकासह हजेरी लावली असून पिंजानी यांनी मुलांना पुढील भविष्यबाबत मार्गदर्शन केले.
शहरातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थाना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे समाजसेविका हेमा पिंजानी यांनी शुक्रवारी कॅम्प नं-२ येथे गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित माखिजानी उपस्थित होते. गुणवंत मुलांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले असून पुढील शैक्षणिक सत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर समाजसेविका हेमा पिंजानी या हजारो मुलांना दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. ज्या मुलांना शैक्षणिक साहित्य हवे असेल, त्यांनी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी केले.