ठाणे - खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयाची लढाई रविवारीही पाहायला मिळाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर वय वाढले म्हणजे परिपक्वता येत नाही, अशी वैयक्तिक टीका केली. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांनीही पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले आहे. बापाची चप्पल आली म्हणजे बापाची अक्कल येत नाही, असा टोला परांजपे यांनी लगावला. तर आपण ठिणगी लावली तर आग लागणारच, आम्ही शिवसैनिक आहोत, असा प्रतिटोला ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी परांजपेंना लगावला.
खारेगाव उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर आधी मंत्री आव्हाड आणि नंतर कल्याणचे खासदार शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेतली. शिंदे यांच्या टीकेला उत्तर देताना परांजपे म्हणाले, आपल्या भाषणात स्वत: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक टीका टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, खासदार शिंदे आणि महापौर म्हस्के यांनी पालकमंत्र्याचे आदेश धुडकवले आहेत.
आव्हाड यांचा घटनाक्रम चुकला असेल, मात्र उड्डाणपुलाच्या आमचा पाठपुरावा असल्याचा पुनरुच्चार केला. खासदार शिंदे यांनी श्रेय घ्यावे मात्र, गृहनिर्माण मंत्र्यांवर, राष्ट्रवादीवर आघात झाला तर आपण प्रतिउत्तर देणारच असेही स्पष्ट केले.
महापौर नारदमुनीआव्हाड यांनी महापौरांना दिलेली नारदमुनींची उपमा ही योग्य होती. महापौर हे कलियुगातील नारदमुनी असून त्यांना दिलेली उपमा योग्य असल्याचा दावाही त्यांनी केला. मग दिवा उड्डाणपूल कधी होणार?उड्डाणपुलाच्या पाठपुराव्याबरोबर मतदारसंघात विकास कामे झाल्याचा दावा केला. ती यापूर्वीही होत होती. जर विकास झाला असेल तर कल्याण टर्मिनन्स, शीळलफाटा, मानकोली मोठा गाव ब्रिज, दिवा उड्डाणपूल कधी होणार, याची टाइम लाईनदेखील खासदारांनी द्यावी, असे आव्हानही परांजपे यांनी दिले.