काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा

By अजित मांडके | Published: March 14, 2024 06:58 PM2024-03-14T18:58:01+5:302024-03-14T19:00:47+5:30

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आव्हाडांची पत्रकार परिषद

Anand Paranjpe of Ajit Pawar faction claimed that Jitendra Awhad did the job of ending Congress in Thane. | काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा

काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: एकीकडे ठाण्यात राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ठाण्यातील काँग्रेसमध्ये दोन गटातील वाद उफाळून आला असताना आणि आव्हाडांनी ही यात्रा मुंब्य्रातून वळविली असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्याने केला, असा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आव्हाडांबाबत केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चे संयोजन करणाऱ्या आव्हाड यांनी, ठाण्यात काँग्रेस संपविण्याचे काम केले असल्याचा गंभीर आरोप परांजपे यांनी केला. ठाणे महापालिकेच्या २०१७ निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला एकही तिकीट आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी दिली नसल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे जिल्ह्यात येणार आहे. त्या निमित्ताने ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. परंतु ही पत्रकार परिषद आव्हाडांनी का घेतली असा सवाल काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी यात्रेचा मार्ग का बदलला असा सवालही उपस्थित केला. त्यानंतर आता परांजपे यांनी थेट आव्हाड यांचे नाव घेत त्यांच्यावर ठाण्यात काँग्रेस संपविल्याचा आरोप केला आहे.

सिन्नरच्या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बेछूट असे आरोप केले. माझ्याबरोबर सकाळी ६ वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला समुदाय पहा. महाराष्ट्रातल्या कानाकोपºयातून लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी साडेपाच पावणेसहा पासून देवगिरी बंगल्यावर रांग लावतात. पण आपल्याला कदाचित सकाळी उठायची सवय नसेल कारण आपले रात्रीस खेळ चालतो, अशी आपली प्रवृत्ती आहे असेही परांजपे म्हणाले. सकाळी सहा वाजल्यापासून अजित पवार जनसेवा करतात. बैलाचे शिंग देखील आपल्याला लागले तर चालायला त्रास होईल, हाच माझा आपल्याला सल्ला आहे असे परांजपे यांनी सांगितले.

आव्हाड यांनी शिवसेनेला २०१९ पर्यंत विरोध केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध केला. धर्मवीर आनंद दिघे यांचा दुस्वास केला. पण मुंब्रा येथील शाखा पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर जितेंद्र आव्हाड होते. कळव्याची शिवसेनेची शाखा व खारीगाव नाका येथील शाखा आव्हाड यांच्यामुळे तुटली असा आरोप देखील त्यांनी केला.

मुख्यमत्र्यांनी आश्वासित केले, वाद मिटला!

बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे हे पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत. त्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी तटकरे यांना आश्वासित केले आहे की, विजय शिवतारे यांना बोलवून योग्य ती समज देईन. यामुळे स्थानिक पातळीवर या विषयावर पडदा टाकलेला आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी या तीनही मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार विजयी करणे हा आमचा संकल्प आहे असे परांजपे म्हणाले.

 

Web Title: Anand Paranjpe of Ajit Pawar faction claimed that Jitendra Awhad did the job of ending Congress in Thane.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.