डोंबिवली : ब्रिज या आंतरराष्ट्रीय खेळाचे तज्ज्ञ आनंद ऊर्फ केशव सामंत यांच्या चमूने एशियन स्पर्धेत बाजी मारली. प्रशिक्षक आनंद सामंत हे स्वत: उत्तम खेळाडू असून, त्यांनी या खेळामध्ये आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत.
आनंद सामंत हे आयआयटीमध्ये कार्यरत होते. सेवानिवृत्त होऊन त्यांना ६ वर्षे झाली. १९७३ पासून ते ब्रिज खेळत आहेत. जयपूर, नैनिताल, ग्वाल्हेर, दिल्ली, मुंबई या ठिकाणच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत. प्रामुख्याने १९८८ मध्ये गुरूदत्त ट्रॉफी, १९८९ मध्ये हैद्राबाद येथे आगरवाला ट्रॉफी, १९९० मध्ये कानपूर येथे सिंघानिया ट्रॉफी, १९९२ मध्ये चेन्नई येथे होळकर ट्रॉफी, १९९६ मध्ये मुंबईत इंटरनॅशनल तोलानी ब्रिज चॅम्पियनशीप, २००४ मध्ये डेहरादून येथे टी.पी.खोसला ट्रॉफी आदी अनेक पारितोषिके त्यांनी पटकावली आहेत. १९९३ मध्ये त्यांनी या खेळासाठी मॉरिशसमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. सॅन्टिअॅगो, चिली येथील बर्मुडा बाऊलवर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अशिया मंडळाचे प्रतिनिधीत्व करण्यास ते पात्र ठरले. १९८८ मध्ये त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. राज्याचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांच्याहस्ते शिवछत्रपती पुरस्कार देऊन सामंत यांचा सन्मान करण्यात आला होता. डोंबिवलीतील तिघांना या खेळामध्ये पुरस्कार मिळाले असून, आर. श्रीधरन, आणि अनिल चक्रदेव यांनाही छत्रपती पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे डोंबिवलीमध्ये ब्रिज खेळासाठी पोषक वातावरण असल्याचे आनंद सामंत यांच्या पत्नी हिरा आवर्जून सांगतात.
ब्रिज हा पत्यांचा खेळ आहे. पत्ते मुलांच्या हातात नको, असे पालकांना वाटते. जे पत्ते खेळतात ते लॅडिज, झक्कू, पाच तीन दोन, बदाम सात असे मोजकेच खेळ खेळतात. खरे तर ब्रिज हा बुद्धीचा खेळ आहे. पत्यांच्या खेळातूनच तो विकसित झाला. त्याचे फायदे अनेक आहेत. या खेळाचा दुसरा लाभ म्हणजे खेळाडूला संयम ठेवावा लागतो. चिडचिड्या, रागीट, संतापी व्यक्तींमध्ये या खेळामुळे आमुलाग्र बदल होतो. या खेळात सहखेळाडूसोबत तुम्हाला जुळवून घ्यावे लागते, असे त्या म्हणाल्या.आजारावर उपायकारकच्अल्झायमरसारख्या आजारावरही हा खेळ उपायकारक आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूची ताकद किती, सहकाऱ्याच्या हातात किती पत्ते आहेत, हुकूमाची पान किती आणि कोणती असतील, त्यानुसार समोरील खेळाडूची किती हात करण्याची तयारी असू शकते, याचा अंदाज बांधून खेळाडूला निर्णय घ्यावे लागतात, असे त्या म्हणाल्या.