ठाणे, दि. 28 - अंबरनाथजवळील रेल्वेच्या जीआयपी धरणाच्या भिंतीला मोठ्या चिरा गेल्या असून, या चिरांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे. धरण फुटण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे. यामुळे २० लाखांहून अधिक नागरिकांच्या जिवाला धोका उत्पन्न झाला असून, या धरणाची ताबडतोब डागडुजी करण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेत केली. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची व्यक्तिश: भेट घेऊन त्यांच्याशीही या विषयावर सविस्तर चर्चा केली.
शून्य प्रहरात धरणाच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करताना खा. डॉ. शिंदे म्हणाले की, या ब्रिटिशकालीन धरणाच्या पाण्याचा वापर पूर्वी वाफेच्या इंजिनासाठी केला जायचा. सध्या या पाण्याचा वापर रेल नीर प्रकल्पासाठी केला जात असून, या धरणातून दररोज २० लाख लीटर पाण्याचा पुरवठा रेल नीर प्रकल्पाला केला जातो. मात्र, धरणाच्या सुरक्षिततेकडे रेल्वेचे दुर्लक्ष होत असून धरणाला अनेक ठिकाणी चिरा पडल्या आहेत. या चिरांमधून पाण्याची धार लागली आहे. धरणाच्या भिंतीला धरून जंगल माजले असून वड, पिंपळासारख्या झाडांची मुळे खोलवर गेल्यामुळे धरणाच्या भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.धरणाच्या खालच्या बाजूस कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आदी शहरे, तसेच अनेक गावांचा समावेश असून २० लाखांहून अधिक नागरिकांच्या जीवितालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने या धरणाची दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत केली. त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन खा. डॉ. शिंदे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांना धरणाच्या भिंतीतून सुरू असलेल्या गळतीचे फोटोही दाखवले. धरणाच्या परिस्थितीविषयी सविस्तर विवेचन करून खा. डॉ. शिंदे यांनी तातडीने या धरणाच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंती प्रभू यांच्याकडे केली.