मीरारोड - भाईंदरच्या डोंगरी येथील रस्त्या लगत असलेले पुरातन धेनुगळ शिल्प व मुंबईच्या मानोरी गावातील कारंजा देवी मंदिरामागे असलेल्या दोन तोफा चौक येथील धारावी किल्ल्यात ठेवण्यास पुरातत्व खात्याने मंजुरी दिली आहे . त्यामुळे धारावी किल्ल्याला खऱ्या अर्थाने किल्ल्याचे स्वरूप येण्यास मोठी मदत होणार आहे .
भाईंदरच्या चौक - तारोडी पासून उत्तन व मुंबईच्या हद्दीतील गोराई आणि मानोरी हा गाव परिसर धारावी बेट म्हणून ओळखला जातो . वैराळे तलाव येथे पुरातन चर्च चे अवशेष असून उत्तन , गोराई व मानोरी ह्या धारावी बेटा वरील तिन्ही गावचे हे एकमेव चर्च होते . त्याठिकाणी सुमारे ४८२ वर्षा पूर्वीची ह्या तिन्ही गावची लोकसंख्या ८४० इतकी व त्यापैकी पुरुष व महिला ७२० आणि मुलांची संख्या १२० होती अशी नोंद केली आहे . भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्ल्याचे अवशेष संरक्षित करून त्याचा पुनर्विकास करण्याची मागणी गडप्रेमींची होत होती . महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी धारावी किल्ल्याच्या सुशोभीकरण , संरक्षण व पुरातन वस्तू संग्रहित करून किल्ले परिसरात ठेवण्यासाठी राज्याच्या पुरातत्व विभागा कडे पत्रव्यवहार चालवला होता .
ढोले यांनी १७ जानेवारी २०२२ रोजी पुरातत्व विभागास पत्र देऊन पुरातन तोफा , दगडी शिल्प आदींची माहिती देऊन येथे खोदकाम केल्यास पुरातन वस्तू मिळतील अशी शक्यता वर्तवली होती . दुसरीकडे धारावी किल्ला जतन समितीचे रोहित सुवर्णा यांनी सुद्धा महापालिका , पुरातत्व विभाग तसेच राज्य मानवी हक्क आयोगा कडे पत्र व्यवहार चालवला आहे .
पुरातत्व खात्याचे पुणे येथील पुरातत्त्वशास्त्रज्ञ प्रणित कुमार यांनी ३ मे रोजी परिसरातील पुरातन वस्तू व शिल्प यांची पाहणी केली होती . मानोरी येथे कारंजा देवी मंदिर जवळ एक तोफ बाहेर असून दुसरी तोफ जमिनीत गाडली गेली आहे . पुरातत्व व वस्तूसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी आयुक्त ढोले यांना पत्र पाठवून दोन्ही तोफा धारावी किल्ल्यावर ठेवण्यास मंजुरी दिली आहे . तोफा पुरातत्वतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखालीच बाहेर काढण्यात याव्यात . तोफा काढल्यावर त्याची पुरातत्वतज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध नोंदणी करून पुरातत्व विभागास सादर करावी . तोफेस तोफागाडा बसवण्याचा प्रस्ताव विभागास सादर करावा . वाहतूक करताना तोफेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे पत्रात कळवले आहे .
तर डोंगरी - आनंद नगर येथे रस्त्याच्या कडेला असलेले दगडी शिल्प हे विरगळ नसून ते सवत्स धेनुगळ आहे . सुमारे २ हजार वर्षां पूर्वीचे हे दगडी शिल्प असल्याची शक्यता आहे . हे धेनुगळ दोन भागात विभागलेले असून वरील भागात शिखर - स्मारक स्तूप असण्याचा प्राथमिक अंदाज आहे . तर खालील भाग हा सवत्स धेनुगळ आहे . सदरहू शिल्प महत्वाचे असून संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संग्रहालयासाठी अधिग्रहित करण्याच्या योग्यतेचे आहे . परंतु महानगरपालिका जबाबदारी घेत असल्यास सदर धेनुगळ शिल्प हे धारावी किल्ल्याच्या बाहेर योग्य जागा निश्चित करून संरक्षित करण्यास हरकत नसल्याचे गर्ग यांनी आयुक्त ढोले यांना पाठवलेल्या दुसऱ्या केला पत्रात म्हटले आहे .
गोराई गावातील पाखाडी बस स्थानक बाजूला असलेल्या पुरातन शिलालेख वर त्या काळचा एकप्रकारचा आदेश असून महिला , प्राणी चे शिल्प आहे . ते गधेगळ असल्याची शक्यता असून या आधी धारावी किल्ला परिसरातून पुरातत्व विभागाने पुरातन मातीच्या भांडीचे अवशेष, जुन्या भिंतीची माती , दगड , चिनी मातीचे भांडीचे अवशेष आदी सापडले होते .