अंबरनाथ: अंबरनाथ येथील 960 वर्ष पुरातन प्राचीन शिवमंदिर पहिल्यांदा श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना चा प्रभाव वाढत असल्याने मंदिर प्रशासन आणि पालिका प्रशासन यांनी एकत्रित येते भाविकांसाठी हे मंदिर बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी आज पासून करण्यात आली.
श्रावणी सोमवारला अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिरात भाविक शेकडोंच्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. मात्र शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने श्रावणी सोमवारला होणारी गर्दी ही भाविकांना त्रासदायक ठरण्याची शक्यता असल्याने हे मंदिर श्रावणात उघडू नये असे मत प्रशासनाने व्यक्त केले होते. त्यानुसार मंदिर प्रशासनाने देखील निर्णय घेत हे मंदिर पूर्णपणे भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदाच श्रावणी सोमवार निमित्त हे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आले असून त्या ठिकाणी देखील एकाही भाविकाला सोडले जात नाही. त्यामुळे काही भाविक मंदिर प्रवेशद्वाराजवळील गेटलाच हार अर्पण करून निघून जात आहे. भाविकांनी आत मध्ये प्रवेश करू नये यासाठी मंदिर प्रवेशद्वाराजवळ खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच कोणताही व्हीआयपी व्यक्तीदेखील मंदिरात जाऊ नये यासाठी मुख्य मंदिराचे द्वार देखील कुलूप लावून बंद करण्यात आला आहे.