बदलापूर : समाजाच्या उत्थानासाठी आयुष्य वेचणारे डॉ. भीमराव गस्ती यांनी प्रथमच स्वत:वरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आवाहन करणारे पत्र मित्र, स्नेह्यांना पाठवले. पण त्यावर काही निर्णय घेऊन मदत पोचेपर्यंत सर्वांना ऋणात ठेवून त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या मित्रपरिवाराला कायमची चुटपूट लावून ते गेले!भीमरावांचे हे पत्र त्यांचे अखेरचे पत्र ठरले. त्यांनी ३१ जुलैला बदलापूर येथील योगी श्री अरविंद गुरु कूल शाळेचे कार्यवाह आणि त्यांचे स्नेही श्रीकांत देशपांडे यांना लिहिलेले पत्र बदलापूरच्या स्नेह्यांना ४ आॅगस्टला मिळाले. त्यांना कशापद्धतीने ठोस मदत करता येईल, यावर विचार करून निर्णय घेण्याच्या आत डॉ. भीमरावांनी जगाचा निरोप घेतल्याचे वृत्त आल्याने बदलापुरातील योगी श्री अरविंद गुरु कूल शाळेत शोककळा पसरली.डॉ. गस्ती यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, मी जीवनभर लोकसेवाच केली. स्वत:साठी काही करू शकलो नाही. सध्या इकडे संस्थेत शिकणाºया देवदासी मुलींची संख्याही वाढली आहे. परिणामी संस्थेचा खर्चही वाढला, व्याप वाढला, प्रवासही वाढला. त्यामुळे माझ्या आरोग्याकडे माझेच पूर्ण दुर्लक्ष झाले. सध्या मी आजारी असून हैदराबाद येथील रु ग्णालयात माझ्यावर उपचार सुरु आहेत. हे उपचार खर्चिक होत असून त्याचा सारा भार कार्यकर्त्यांच्या अंगावर पडतो आहे. त्यामुळे मला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. जे जवळचे व आत्मीय मित्र आहेत त्यांनाच सांगतो आहे. या मदतीमुळे मी बरा होईन. अजून तसे खूप काम करायचे आहे, असे सांगत त्यांनी पत्रात आपल्या बँकेचा खाते क्रमांकही दिला आहे.अंबरनाथच्या एज्युकेशन सोसायटीने संस्थापक भाऊसाहेब परांजपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरु केलेला पहिला दधिची पुरस्कार १९९८ मध्ये डॉ. भीमराव गस्ती यांना देऊन त्यांचा गौरव केला होता. त्याचप्रमाणे बदलापूरच्या योगी श्री अरविंद गुरूकुल शाळेनेही सुरु केलेला पहिला योगी अरविंद पुरस्कार २०११ मध्ये डॉ. गस्ती यांना देण्यात आला होता.संस्थांशी ऋणानुबंध असल्याने त्यांचे पत्र मिळताच मदतीबाबत मित्रांशी चर्चाही झाली. आठवडाभरात आम्ही हैदराबादला प्रत्यक्ष जाणारही होतो. मात्र सकाळीच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचे कळल्याने मन सुन्न झाले. त्यागी वृत्तीच्या या योगी पुरु षाने पहिल्यांदाच स्वत:साठी काही तरी मागितले; पण ते त्यांच्या तत्त्वात बसत नसल्याने मदत न घेताच त्यांनी जगाचा निरोप घेतल्याची भावना श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.
...आणि मदत स्वीकारण्यापूर्वीच डॉ. भीमराव गस्तींनी घेतला निरोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:33 AM