अनिकेत घमंडी, डोंबिवलीशिवसेनेत निष्ठावान आणि नवइच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड चढाओढ सुरू आहे. त्यातच पक्षाने उमेदवारी द्यायची न द्यायची, हा पक्षाचा प्रश्न आहे, मी तर अर्ज भरणारच, असे सांगून शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक आणि या निवडणुकीतील शिवमार्केटमधील इच्छुक उमेदवार केतन दुर्वे यांनी सोमवारी सकाळी अर्ज भरला. अद्यापही पक्षाने ए-बी फॉर्मचे वाटप केलेले नाही तरी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. कदाचित, पक्ष अन्य कोणाला येथून उमेदवारी देईलही, त्यामुळे आधीच फॉर्म भरलेला बरा, पक्षाने नाही दिला तर मग बघू... अशी भूमिका त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.दुर्वेंप्रमाणेच रामनगर, सावरकर रोड, पेंडसेनगर आदींसह अन्य ठिकाणी अशीच धुसफूस सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पक्षात अंतर्गत तणाव असल्याची माहितीही देण्यात आली. उद्या दुपारपर्यंत पक्षाकडून ए-बी फॉर्मसंदर्भात वाट बघणार, अन्यथा अर्ज तर दिलाच आहे. त्यामुळे चिंता आपण नाही तर पक्षाने करावी, असा सूर आळवण्यात येत आहे. पेंडसेनगरमध्ये देखील अशीच अवस्था असून या ठिकाणाहून इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने गेल्या आठ-दहा महिन्यांपासून उभे राहायला मिळणार, यासाठी फिल्डिंग लावली होती. अचानक तिकीट न मिळण्याचे संकेत आल्याने तेदेखील नाराज झाले. त्यांनीही असे चालणार नसल्याचे सांगून आवाज उठवला आहे. अशीच स्थिती सावरकर रोड प्रभागाची असून या ठिकाणच्या इच्छुकांमधला संघर्ष उफाळला आहे.-------------रामनगरमध्ये तर कहर असून शिवसेनेकडून तीन इच्छुक उमेदवार आहेत. त्यातील एका नवख्या उमेदवाराने आधी शिवसेनेत आणि त्यानंतर तातडीने भाजपाकडूनही मुलाखत दिली होती. त्यामुळे हे कसले निष्ठावान, असे सांगून अन्य इच्छुकांमध्येही अस्वस्थता धुमसत आहे. अशा विचित्र कोंडीमुळे पक्षश्रेष्ठी कचाट्यात सापडले असून मार्ग कसा काढावा, हा पेच त्यांच्यासमोर आहे. शिवमार्केटमधून सेनेतर्फे दुर्वे, विनय भोळे, संदीप नाईक, कुणाल ढापरे, मनोहर पाटील असे पाच जण इच्छुक आहेत. त्यातील दुर्वे यांना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून गेल्या टर्मला स्वीकृत नगरसेवकपद दिले होते. असे असताना त्यांनी कुठूनही फॉर्म भरावा, असे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यावर, मात्र दुर्वेंनी जेथे ५० हून अधिक वर्षे राहतो, तेथून इच्छुक असल्यास हरकत काय, असा सवाल केला. तसेच ए-बी फॉर्म मिळो न् मिळो, आता अर्ज भरला असून पुढे काय करायचे, हे पक्षाने ठरवावे. मी तर ठरवलेलेच असल्याचेही ते म्हणाले.
...आणि शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराने अर्ज भरलाच
By admin | Published: October 13, 2015 1:55 AM