डोंबिवली : मॅरेथॉन स्पर्धेत मी प्रथमच धावले. मला माझ्या बालपणीची आठवण झाली. पूर्वी लहान असताना अशा स्पर्धेत सहभागी होत असे. या स्पर्धेने मला वयाच्या ५९ व्या वर्षीही मी यशस्वी होऊ शकते, हा आत्मविश्वास दिला आहे, अशी भावना महिला गटातून प्रथम क्रमांक येणाºया शीला पाटील यांनी व्यक्त केल्या.निमित्त होते ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना मध्यवर्ती शाखेने नुकत्याच घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉन स्पर्धेचे. त्याचबरोबर शिवसेनेतर्फे आठवडाभर विविध सामाजिक व कला, क्रीडा उपक्रमही राबवण्यात आले.मॅरेथॉन स्पर्धेत डोंबिवलीतील १५० आजीआजोबांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ६० ते ७०, ७० ते ८० व ८० च्या पुढील असे तीन गट करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ ९८ वर्षांचे रघुनाथ केतकर यांनी भगवा झेंडा दाखवून केला. या स्पर्धेत ८१ वर्षांच्या शशिकला परळकर या सर्वात मोठ्या वयाच्या स्पर्धक होत्या. शिवसेना मध्यवर्ती शाखेपासून स्पर्धेला प्रारंभ झाला. टिळक चौक, सर्वेश सभागृह, फडके रोड, इंदिरा चौकात ही स्पर्धा संपुष्टात आली. ही स्पर्धा अडीच ते तीन किलोमीटरच्या अंतराची होती. हे अंतर स्पर्धकांनी ५ ते १० मिनिटांत पूर्ण केले. स्पर्धेचे संयोजन वैशाली दरेकर-राणे यांनी केले होते.शीला पाटील म्हणाल्या, मॅरेथॉन स्पर्धा खूप चांगली वाटली. ज्येष्ठांसाठी अशा स्पर्धा झाल्या पाहिजेत. मी दररोज सकाळी एक तास चालते. परंतु, कधी धावले नव्हते. या स्पर्धेविषयी माहिती मिळाली म्हणून आपणही सहभागी होऊ या, असे वाटले. २१ जानेवारीला डोंबिवलीत स्पर्धा झाली होती. परंतु, त्या स्पर्धेची संधी माझ्याकडून हुकली होती. त्या स्पर्धेची कसर या स्पर्धेने भरून काढली आहे, असे सांगितले.६० ते ७० वयोगटातील पुरुषांमध्ये हेमंत दहाने व महिलांमध्ये शीला पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ७० ते ८० वयोगटातील पुरुषांमध्ये महंमद गफार तर महिलांमध्ये शरयू काथे यांनी बाजी मारली. पदक, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले.शिवसेनेचे शहरप्रमुख व सभागृहनेते राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, विधानसभा संघटक तात्या माने, उपशहरप्रमुख परिवहन सदस्य संतोष चव्हाण, उपशहरप्रमुख अरविंद बिरमोळे, अभिजित थरवळ, किशोर मानकामे आदी मान्यवर उपस्थित होते.
...अन् बालपणाच्या आठवणी झाल्या ताज्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 6:21 AM