डोंबिवली: दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी विद्यार्थी भारती संघटनेकडून गटारी अमावस्येच्या रात्री ठीक 10:00 वाजता एक रात्र भुताची ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. तरुणांना अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आवाहन केल्यानंतर जवळजवळ 150 विद्यार्थ्यांनी बुधवारची रात्र स्मशानात अनोख्या व विविध उपक्रमांनी पार पाडली. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन हे वेगळ्या व इनोव्हेटीव्ह पध्दतीने होत असते .
अनेक घाबरणाऱ्या मुलांची भीती दूर करण्यासाठी विविध प्रकारचे Tasking Games ठेवण्यात आले होते. खास अस्तित्वातच नसलेल्या भुतांवर बनवलेली स्वरचित गाणी जी या संघटनेच्याच कार्यकर्त्यांनी स्वतः बनवलेली होती व विविध गाण्यांची मैफिल, त्याचबरोबर अंधश्रद्धेवर रचलेले पथनाट्य करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. व या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे राज्यसचिव जितेश पाटील, पूजा मुधाने व आरती गुप्ता यांनी अत्यंत उत्कृष्ट पध्दतीने केले.
त्याचबरोबर या कार्यक्रमात उपस्थित टीम परिवर्तनचे शाहिर स्वप्नील शिरसाठ व त्यांचे साथी यांनी अंधश्रद्धेचे विविध प्रयोग करून दाखवले आणि भोंदूबाबा आपल्या सुशिक्षित अज्ञानी मंडळींनाही कसे लुबाडते हे सिद्ध करून दाखवले. आमच्या देशात कोणी कितीही शिकला साधा विज्ञान विसरला या शब्दाची अनेक गाणी देखील गाऊन सहभागी विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचे प्रबोधन केले असल्याचे राज्यकार्यवाह प्रणय घरत यांनी सांगितले.
विद्यार्थी भारती संघटनेचे संस्थापक किशोर जगताप यांनी देखील अंधश्रद्धा मुळापासून संपवणे ही आजच्या तरुणांपुढील एक मोठे आव्हान असून यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. फक्त मी भूत, प्रेत ,आत्मा या गोष्टी मानत नाही आणि अंधश्रद्धा पाळत नाही असे सांगून आपले काम संपत नाही . तर जे अंधश्रद्धा पाळतात त्यांना त्यातून बाहेर काढणे हे आपलं कर्तव्य असले पाहिजे असं सांगत तरुणांना मार्गदर्शन केले. तसेच 'भुता भुता ये रे आम्ही तुम्हाला भेटायला आलोय रे ' अशा गाण्यांनी स्मशानात भुतांना येण्याचे आव्हान केले व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सांगता सकाळी 06:06 मिनिटाने झाल्याचे विद्यार्थी भारती संघटनेच्या मुंबई विद्यापीठ अध्यक्षा आरती गुप्ता यांनी संगितले.