ठाणे : बाळाच्या जन्मानंतर काही दिवसांतच त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी आईवडील उत्सुक असतात. बाळाचे बोबडे बोल कानांवर पडताच आईवडिलांसह घरातील सारेच आनंदी होतात. ठाण्याच्या आद्य संदीप गुळदेकर याचे लहानपणापासून ऐकणे आणि बोलणे बंद होते. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आर्थिक साहाय्य केल्यामुळे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने आता आद्य ऐकू व बोलू लागला आहे. साहजिकच, निराश असलेल्या आद्य आणि पालकांच्या आयुष्यात आनंदाचा झरा निर्माण झाला.आद्य याला मागील साडेतीन वर्षांपासून श्रवणदोषाची समस्या भेडसावत होती. पालकांनी बरेच प्रयत्न केले. शस्त्रक्रियेसाठी होणारा खर्च मोठा होता. जयस्वाल यांच्या कानांवर आद्यची समस्या गेल्यावर त्यांच्या विशेष प्रयत्नाने ज्युपिटर हॉस्पिटलमधील नामवंत डॉ. प्रदीप उप्पल यांच्याकडे आद्यचे आॅपरेशन करण्यात आले. ठाण्याच्या विकासात भरीव योगदान देणाऱ्या महापालिका आयुक्तांनी आद्यच्या आॅपरेशनची जबाबदारी घेऊन पुन्हा माणुसकीचे दर्शन घडवले आहे. आद्य हा प्रभाग क्र .१३ च्या नगरसेविका प्रभा बोरीटकर यांचा नातू असून सोमवारी महापालिका भवन येथे त्यांनी व आद्यच्या पालकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. त्यावेळी आद्यचे बोल ऐकून खुद्द जयस्वाल हेही आनंदून गेले.
...अखेर चिमुरडा आद्य बोलू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:48 AM