कल्याण - कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेतील फ प्रभागात होत असलेल्या बेकायदा बांधकाम प्रकरणी प्रभाग समितीच्या भाजप सभापती खुशबू चौधरी यांनी प्रभाग अधिकारी अमित पंडीत व डोंबिवलीचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या विरोधात एक दिवसापूरती तरी निलंबनाची कारवाई अन्यथा महासभा तहकूब करा या मागणीला महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दाद दिली नाही. त्याच्या विरोधात भाजप सदस्यांनी महासभेचे कामकाज रोखून धरण्यासाठी सभागृहात जय श्रीराम, मोदी, गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा दिल्या त्याला शिवसेनेच्या महिला सदस्यांनी मंदिर वही बनायेंगे मगर तारीख नही बतायेंगे अशा घोषणाबाजींनी प्रतिउत्तर दिले. यामुळे सभागृहात एकच गोंधळ माजला. या गोंधळात सभा पूर्ण दिवसाकरीता तहकूब करण्याची मागणी धुडकावून लावत सभा पटलावरील सर्व विषय मंजूर केले. याच मुद्यावर शिवसेना भाजप आमने सामने आले. सभेच्या पश्चातही प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
सभागृहाच्या बाहेर पडून भाजप सदस्यांनी महापौर हाय हाय अशा जोरदार घोषणा दिल्या. त्याला शिवसेना महिला सदस्यांनी महापौर यांचा विजय असो असे प्रतिउत्तर दिले. भाजप सदस्यांनी महापौरांच्या दालनाबाहेर जाऊनही घोषणाबाजी केली. तसेच तळ मजल्यावरही घोषणाबाजी सुरुच ठेवली. त्याला शिवसेनेच्या महिलांनी तितक्याच जोरदारपणो प्रतिउत्तर देत महापौरांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. या प्रकारामुळे एकच गोंधळ माजला होता. फ प्रभाग समितीच्या सभापती खूशबू चौधरी यांनी प्रभाग समितीला कोणतेही अधिकार नाहीत. त्यांना अर्थिक तरतूद नाही. समितीच्या सभेला अधिकारी गैरहजर राहतात. बेकायदा बांधकाम प्रकरणी कारवाई करीत नाहीत. प्रभाग अधिकारी अमित पंडीत व नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी सभा तहकूबीची सूचना मांडली होती. त्यावर महापौर देवळेकर यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना निवेदन करण्यास सांगितले.
अतिरिक्त आयुक्तांनी बेकायदा बांधकाम प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने संबंधित अधिका:यांची चौकशी करुन कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. त्यावर आयुक्तांनी निवेदन दिले आहे. त्यामुळे चौधरी यांनी सभातहकूबी मागे घ्यावी अशी विनंती केली. मात्र या विषयावर भाजप सदस्या प्रमिला चौधरी, राजन सामंत, गटनेते वरुण पाटील हे आग्रही होते. महिला सदस्यांचा महापौरांकडून अवमान केला जातो. तसेच अधिकारीही महिला सदस्यांना जुमानत नाही. महापालिकेच्या सर्व समित्यावर महिला सभापती केवळ नावाला आहे. त्यांना कोणताही अधिकार नाही. त्यामुळे सभा तहकूबी करा असा आग्रह धरला. त्याला विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांनीही दुजोरा दिला. मात्र महापौरांनी केवळ पाच मिनिटे सभा तहकूब केली. त्यानंतर सभेला महापौर समोरे गेले नाही. त्यांच्या जागी महापौर म्हणून सभागृह नेते राजेश मोरे यांनी काम पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा भाजप सदस्यांनी पुन्हा घोषणाबाजी सुरु केली. पुन्हा मोरे यांनी दहा मिनीटे सभा तहकूबी केली. या गोंधळापश्चात पुन्हा महापौर सभागृहात आले. तेव्हा पुन्हा भाजप सदस्यांनी त्यांची मागणी लावून धरीत घोषणाबाजी केली. पाच व दहा मिनीटे दोन वेळा सभा तहकूब केली आहे. त्यामुळे सभा तहकूबी संपुष्टात आली आहे. मात्र भाजप सदस्य ठाम राहिले. त्यावर महापौरांनी सभेच्या विषय पत्रिकेवरील विषय पुकारून सर्व विषयांना मंजूरी दिली. त्याला मंजूर मंजूर असा शिवसेनेच्या सदस्यांनी आवाज करुन सांगितले. लगेच राष्ट्रगीतीने सभा संपली.
दरम्यान भाजप गटनेते पाटील व सदस्य राहूल दामले यांनी मंजूर केलेले विषय हे चुकीच्या पद्धतीने केलेले आहे. महापौरांनी अधिका:यांना पाठिशी घातले आहे. आम्ही विषय मताला टाकण्याची मागणी केली होती. मात्र शिवसेनेची उपस्थिती कमी असल्याने त्यांनी त्यावर मतदान घेतले नाही. महापौरांच्या मनमानी विरोधात नगरविकास खात्याकडे व मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार आहे.