लोकमत न्युज नेटवर्कमीरारोड - मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील वरसावे येथे असलेला सरकारी तलाव माफियांनी चोरल्याच्या आदिवासींसह श्रमजीवी संघटनेच्या तक्रारींवर कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयावर लोकमत मधून टीकेची झोड उठताच आता तलाव चोरांनी पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम सुरु करुन सरकारी तलाव परत करण्याचे काम सुरु केले आहे. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी मात्र दोन दिवसांपुर्वीच तलाव चोरीला गेला नसुन त्याचे उलट सुशोभिकरण केल्याचा दावा करत दुसराच तलाव दाखवला होता. पण आज रविवारी तलावाचे खोदकाम सुरु केल्याने तलावचोरांचे पितळ उघडे पडले आहे. तर गुन्हा दाखल करा, अशी मागणी श्रमजीवीने केली आहे.वरसावे नाकाच्या एकस्प्रेस इन हॉटेल कडून जाणाऱ्या रस्त्यावर मेहतांच्या ७११ हॉटेल्स कंपनीचे सी एन रॉक हॉटेल आहे. या भागातील जवळपास सर्वच जमीन ७११ हॉटेल्सच्या ताब्यात असुन या ठिकाणी लागुनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द आहे. त्यात डोंगर असुन पावसाळ्यात येणारे पाणी खाली खाजगी जागेत नैसर्गिकरीत्या साचुन तलाव व पाणथळ आहेत. वन हद्द असल्याने त्या लगतचा परिसर देखील इको सेंसेटिव्ह झोन मध्ये येत आहे.याच वन हद्दी लगत सर्व्हे क्र. ९० मध्ये पुर्वी पासुनचे नैसर्गिक पाणथळ - तलाव होते. सातबारा नोंदी देखील सदर तलाव सरकारी असल्याची नोंद असुन त्याचे सुमारे ८ हजार चौ.फुट इतके क्षेत्र आहे. सदर सरकारी तलावाचा पुर्वी पासुन आदिवासी वापर करत आले असुन वन विभागाच्या कुंपण भिंत बांधण्याआधी वन्य जीव या भागातील तलाव - पाणथळ वर पाणी पिण्यासाठी येत. आता देखील माकड आदी वन्यजीव तसेच पक्षी येत असल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे.मेहतांच्या ७११ हॉटेल्स कं. नीने सातबारा नोंदी सरकारी तलाव असताना या जागेत भराव सुरु केला. एप्रिल २०१६ पासुन आदिवासींसह श्रमजीवी संघटनेने त्यावेळी आमदार नरेंद्र मेहतांचे नावानिशी सदर सरकारी तलावात भराव केल्याची तक्रार केली होती. सतत तक्रारी अर्ज देऊन देखील जिल्हाधिकारी, तहसिलदार व त्यांच्या अधिनस्त अधिकारी तसेच महापालिका आयुक्त व पालिका अधिकाऱ्यांनी राजकीय माफियांच्या वरदहस्तामुळे कोणतीच कारवाई केली नाही. दुसरीकडे बेधडक भराव सुरुच ठेवण्यात येऊन तलावच बुजवण्यात आला व सभोवताली कुंपण घालुन लॉन बनवण्यात आले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व आयुक्त बालाजी खतगावकर यांनी तलाव चोरणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले असे आरोप होऊ लागले.
खोदकाम कशासाठी?अखेर आज रविवारी सदर सर्व्हे क्र. ९० मधील सरकारी तलाव पोकलेनच्या सहाय्याने खोदण्याच्या कामास सुरवात झाली आहे. पोकलेन ने खोदकाम करुन पुन्हा तलाव निर्माण केला जात आहे. खोदलेली माती डंपरने भरुन नेली जात आहे. त्यामुळे सदर तलाव हा मेहतांच्या ७११ कंपनीने चोर,ल्याचा आमचा आरोप खरा ठरला असुन यात गुन्हे दाखल करा आणि बेजबादार पालिका व सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करुन सह आरोपी करा अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे.या आधी सदर भागात ७११ हॉटेल्स कंपनीने नैसर्गिक पाणतळ - तलावात मोठ्या प्रमाणात भराव करुन त्यात बांधकामे केली गेली. इको सेंसेटीव्ह झोन असुनही डोंगर फोडला गेला व मोठ मोठी झाडे मारण्यात आली. वन विभागाने पाहणी करुन अहवाल दिला तर इको सेंसेटीव्ह झोन समितीत चर्चा झाली. पण अजुनही गुन्हा दाखल झाला नाही वा कार्यवाही केली गेली नाही.