कल्याण : शहरात साठणाऱ्या कचºयाच्या ढिगाºयांकडे केडीएमसी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना काही विभागांमध्ये नियमित होणाºया साफसफाईचेही तीन तेरा वाजले आहेत. कुष्ठरूग्णांची वसाहत असलेल्या हनुमाननगरमधील साफसफाई अभावी तुंबलेली गटारे आणि ठिकठिकाणी साचलेल्या कचºयाकडे महापालिकेच्या कर्मचाºयांनी कानाडोळा केल्याने या वसाहतीतील तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छता मोहीम हाती घ्यावी लागली आहे. शुक्रवारी संपूर्ण परिसराची स्वच्छता केल्यानंतर सोमवारी देखील हे अभियान राबवले जाणार आहे.कुष्ठरुग्णांची वसाहत म्हणून कचोरे हनुमान नगर परिसराची ओळख आहे. याठिकाणी कुष्ठरूग्ण आणि त्यांच्या कुटुंबांची मोठी वसाहत वास्तव्याला आहे. हा भाग विकासाच्या दृष्टीने नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. सर्वत्र स्वच्छता राखण्याचे आवाहन केडीएमसीच्या वतीने केले जात आहे. केडीएमसीची यंत्रणा इतरत्र प्रभावीपणे राबत असताना या वसाहतीकडे मात्र घनकचरा व्यवस्थापन विभागाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. गटारांची नियमितपणे साफसफाई होत नाही. त्यात कचराही वेळच्यावेळी उचलला जात नाही. यात पावसाळा सुरू झाल्याने ही परिस्थिती रोगराईला आमंत्रण देणारी ठरली आहे. या एकूणच परिस्थितीचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याने वसाहतीमधील नागरिकांनाच स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा लागला आहे.शुक्रवारी येथील तरूण आणि ज्येष्ठ नागरिकांनी हे स्वच्छता अभियान राबविले. हनुमान नगर कुष्ठपिडीत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांच्यासह संतोष वाघमारे, अजय कोठारे, दत्तू गोळे, हजरतअली शेख, कमलाकर भडकवाढ, एमनाथप्पा गायकवाड, श्रीकांत कोटुरकर यांसह तरूण मंडळींनी यामध्ये सहभाग घेतला.हनुमाननगर वसाहतीचा परिसर मोठा असल्याने काही भागाची स्वच्छता शुक्रवारी करण्यात आली. यामध्ये श्रीकृष्ण मंदिर परिसरासह वसाहतीचा मुख्य भाग स्वच्छ करण्यात आला. सोमवारी पुन्हा एकदा अभियान राबवून वसाहतीच्या उर्वरीत भागात स्वच्छता करण्यात येणार आहे.वसाहतीत नियमितपणे होत नसलेल्या साफसफाईबाबत महापौर विनीता राणे यांचेही लक्ष वेधण्यात आले होते. सफाई कामगार पाठविले जातील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतू आजतागायत कोणीही कामगार याठिकाणी आलेला नाही. वसाहतीमधील वाढत जाणारी अस्वच्छता पाहता अखेर आम्हालाच पुढाकार घ्यावा लागला, असे हनुमान नगर महाराष्ट्र कुष्ठपिडीत संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी सांगितले.त्यामुळे परिस्थिती उद्भवली : हनुमान नगर वसाहतीत प्रभावीपणे साफसफाई होत नाही ही वस्तूस्थिती आहे. सध्या कर्मचारी वर्गाची वानवा जाणवते आहे. तरीपण कर्मचारी वर्ग वाढवून तेथील साफसफाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया केडीएमसी डोंबिवली विभागाचे सहा. सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी दिली.
...आणि त्यांनीही हाती घेतला झाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:17 AM