अनगाव : अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामास विलंब लावणाऱ्या कंत्राटदारास नोटीस बजावली असून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गवई यांनी दिली. या केंद्रातील आंतररुग्ण आणि प्रसूती विभाग दुरुस्तीच्या नावाखाली बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या १० फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झाले. या वृत्ताची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेऊन चौकशीचे आदेश संबंधितांना दिले. श्रमजीवी संघटनेने या केंद्राची पाहणी करून तेथील समस्या जाणून घेतल्या. संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती. निंबाळकर यांनी गटविकास अधिकारी डॉ. करुणा जुईकर यांना चौकशीचे आदेश देत कामास विलंब का झाला, यासंबंधी माहिती देण्याची सूचना केली होती. त्यानुसार, त्यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता जी.एस. गीते यांनी आरोग्य केंद्राची पाहणी केली. संबंधित कंत्राटदारावर कारवाईचे आदेश दिले. नोटीस बजावली असून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. सहा महिन्यांपासून बंद असलेले आंतररुग्ण, प्रसूती विभागाचे काम सुरू केले आहे. हा विभाग सहा महिन्यांपासून दुसऱ्या ठिकाणी सुरू आहे. (वार्ताहर)
अनगाव आरोग्य केंद्राची दुरुस्ती
By admin | Published: February 20, 2017 5:39 AM