ठाणे : आदिवासी पाड्यातील बालकांना नैसर्गिक वातावरण, स्वच्छ व चांगल्या जागेत शिक्षण मिळावे, बालकांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने शहापूर तालुक्यातील दळखण ग्रामपंचायतीमधील विंचूपाडा या आदिवासी वस्तीत लोकसहभागातून अंगणवाडी बांधली आहे. त्यामुळे येथील मुले आनंदाने अंगणवाडीत जाणार आहेत. बुधवारी या अंगणवाडीचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी समाजसेवक पप्पू मिश्रा, सरपंच मंगला डोके, उपसरपंच भगवान मोकाशी, माजी सरपंच विनायक आपटे व ग्रामसेविका माधवी कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विंचूपाडा येथे कै. अश्विनी सुदाम थोराड हिच्या स्मरणार्थ भागीर्थी सुदाम थोराड यांनी अंगणवाडीसाठी दोन गुंठे जागा दान स्वरूपात दिली आहे. या अंगणवाडीच्या इमारतीसाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सेवाभावी संस्थांनी वस्तुरूपी, तसेच रोख देणगी देऊन अंगणवाडी उभारणीसाठी सहकार्य केले.
शहापूर तालुक्यातील दळखण ग्रामपंचायत ही सोयी-सुविधांनी सुसज्ज असून, हे गाव आदर्शवत आहे. नुकतेच या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. एखादी गोष्ट लोकांनी मनावर घेतली, तर तिचा कसा सकारात्मक परिणाम होतो, याचे हे उदाहरण म्हणावे लागेल. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उत्तम समन्वयाने गावाचा कायापालट होत असून, आदिवासी पाड्यातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी लोकसहभागातून अंगणवाडीची इमारत बांधली असल्याची भावना उपसरपंच भगवान मोकाशी यांनी व्यक्त केली.