लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : जिल्ह्यातील कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाडी केंद्र आणि त्याद्वारे होणारे विविध उपक्रम उपयुक्त ठरले आहेत. याद्वारे होणारी कामे ऑनलाईन नोंद केली जात आहेत. पण यासाठी दिलेले मोबाईल कमी क्षमतेचे व जुने झाल्याने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण सेविकांनी तब्बल दोन हजार ७०० मोबाईल महिला बालकल्याण विभागासह प्रकल्प कार्यालयात जमा केलेले आहेत. यामुळे सेविकांना आता ऑफलाईन कामे मोठ्या प्रमाणात करावी लागत असून, प्रशासनास याबाबत रिचेबलचा सामना करावा लागत आहे..
जिल्ह्यातील या अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांद्वारे बालकांना प्राथमिक पूर्व शिक्षणासह त्यांना पोषण आहार वेळेत देऊन त्यांना सशक्त केले जात आहे. यामुळे कुपोषणमुक्तीकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. या कामांची शहानिशा करण्याच्या दृष्टीने सेविकांकडून होणाऱ्या सर्व दैनंदिन कामांचे अहवाल तात्काळ ऑनलाईनद्वारे नोंद केली जातात. हा रोजचा अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसह एकात्मिक बालविकास विभागाच्या विविध विभागांना अहवाल दिला जात आहे. पण त्यासाठी दिलेल्या मोबाईलची क्षमता कमी असून, ते जुने झाले आहेत. त्यामुळे ते सतत नादुरुस्त होत असून, त्यांच्या दुरुस्तीचा खर्चही सेविकांना करावा लागतो. एवढेच नव्हे तर त्यातील ॲपही मराठीऐवजी इंग्रजीत असल्यामुळे सेविकांना त्याचाही मनस्ताप होत आहे. त्यामुळे सेविकांनी संताप व्यक्त करून जिल्हाभरातून तब्बल दोन हजार ७०० मोबाईल शासनाकडे जमा केले. यात सर्वाधिक शहरी भाग आहे.
.........
जिल्ह्यातील जि.प.चे अंगणवाडी केंद्र- १५५६
अंगणवाडी सेविका - १४७४
शहरांसह ग्रामीणमध्ये जमा झालेले मोबाईल- २७००
......