ठाणे : अंगणवाडी कर्मचारी भरतीचा शासन निर्णय झाला. त्यानुसार नगरपालिका, नगर परिषदा व महापालिका क्षेत्रातील मदतनीस पदोन्नतीसाठी प्रभागाची अट रद्द करून न्याय दिला जावा. तसेच बंद पडलेल्या माेबाइलमुळे अंगणवाडीसेविकांना दुरुस्तीवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रलंबित मागण्या मंजूर करून निकृष्ट मोबाइल प्रशासनाला करण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका आंदोलनाच्या तयारीत आहेत.
शासनाने दिलेले मोबाइल सतत बंद पडत आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी २५०० रुपयेपर्यंतचा खर्च येत असून, ताे वेळेवर मिळत नाही. ठेकेदार त्यावरील रकमेची दुरुस्ती दाखवतो व सेविकांची आर्थिक पिळवणूक करतो म्हणून हे मोबाइल निर्लेखित करून चांगले मोबाइल द्यावेत, या मागणीसह अंगणवाडीसेविकांना पोषणआहाराच्या कामकाजाच्या नोंदी करायला सांगितले जाते. मात्र मोबाइलमध्ये मराठीत उत्तरे लिहिण्याची सोय नसल्याने सर्व पत्रव्यवहार मराठीतच करा, पोषणकर ॲप मराठीत येईपर्यंत शासनाने अंगणवाडीसेविकांना रजिस्टर द्यावेत, या प्रमुख मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक बोलावून तातडीने चर्चा करावी, अन्यथा १ ऑगस्ट २०२१नंतर शॉर्ट नोटीस देऊन आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही शासनास देण्यात आल्याचे या राज्य कृती समितीचे ज्येष्ठ नेते ॲड. एम. ए. पाटील यांनी सांगितले.