- सदानंद नाईक
उल्हासनगर : बालविकास प्रकल्प विभागा मार्फत चालविण्यात येत असलेल्या अंगणवाडी सेविकेच्या सर्वेक्षणात तब्बल ९२ मुले कुपोषित आढळून आली. मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी नियमित आरोग्य तपासणी होऊन इतर मुलांच्या तुलनेत दुपट्ट पोषक आहार देण्यात येत असल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली.
उल्हासनगरात बालविकास प्रकल्प विभागा अंतर्गत एकून २११ अंगणवाडी चालविण्यात येतात. ३ ते ६ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करून त्यांची अंगणवाडीत नोंदणी केली जाते. तसेच त्यांची पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी तयारी करून घेतली जाते. त्याच बरोबर मुलांची नियमित आरोग्य तपासणी करून त्यांचे शासन निकर्षानुसार वजन आहे की नाही?. याचीही नोंद ठेवली जाते. अंगणवाडी सेविकेच्या सर्वेक्षणात शासन निकर्षानुसार तब्बल ९२ मुलांचे वजन कमी असल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली. याप्रकारने शहरी भागातही कुपोषित मुलांची संख्या लक्षणीय असल्याचे उघड झाले. कुपोषित मुलांचे आरोग्य सदृढ होण्यासाठी त्याची नियमित आरोग्य तपासणी करून इतर मुलांच्या तुलनेत दुपट्ट पोषक आहार देण्यात येतो.
बालविकास प्रकल्प विभागा अंतर्गत जसे मुलावर लक्ष केंद्रित केले जाते. तसेच गरोदर महिला व स्तनदा मातांचे सर्वेक्षण करून नोंदणी केली जाऊन त्यांच्या आरोग्यासाठी पोषक आहार अंगणवाडी सेविका मार्फत दिला जातो. यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस मोलाचे काम करतात. शहरातील एकून २११ अंगणवाडी मध्ये तब्बल १० हजार ५९२ मुलांची तर १ हजार ८३० गरोदर व स्तनदा मातांची नोंद आहे. अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे काम कोरोना काळात सुरू होते. त्यांच्यामुळे सविस्तर माहिती व रुग्णाची माहिती आरोग्य विभागाला मिळत होती.
अंगणवाडी सेविका व मदतनीस घुसमट?
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कोरोना काळात तुटपुंज्या पगारात महत्त्वपूर्ण काम केले। त्यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष द्यावे. अशी मागणी अंगणवाडी सेविका संघटनेने केली. त्यांच्याकडे जुन्या व्हर्जनचे मोबाईल असून विभागीयस्तरावर पोषण आहाराची माहिती भरण्यासाठी इंग्रजी माध्यमाचा अँप मोबाईल मध्ये आहे. त्यामुळे त्यांनी माहिती व्यवस्थित भरता येत नसल्याचे कारण देऊन, जुने मोबाईल प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परत केले. नवीन मोबाईल व मराठी माध्यमाच्या अँप देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांना केली.