विशाल हळदे
ठाणे - एबाविसे योजनेत काम करणा-या अंगणवाडी महिला कर्मचा-यांना शासकीय कर्मचारीचा दर्जा देऊन वेतन व सेवेचे फायदे देण्यात यावे, त्यांना मिळत असलेल्या अल्पशा मानधनांत भरघोस वाढ देण्यात यावी, सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांना मिळणा-या वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून देण्याचे तातडीने निर्णय शासनाने करावे या व इतर मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे धरणे आंदोलन करण्यात आले.
अंगणवाडी कर्मचा-यांची मागणी आहे की, योजनेच्या कामासाठी त्यांना शासनाकडून मोबाईल देण्यात यावा, त्यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईल मध्ये काम करण्याची सक्ती करण्यात येवू नये, मोबाईल रिचार्जसाठी २०२१ पासून खर्च झालेले पैसे देण्यात यावे. २०२१ पासूनची अंगणवाडीच्या भाडयाची रक्कम देण्यात यावी. २०१७ पासून सेवानिवृत्त करण्यात आलेल्या सेविकांना एक लाख व मदतनिसांना ७५ हजार रू. शासन आदेशानुसार रक्कम देऊन त्यांची म्हातापरणी होणारी उपासमार थांबवावी. तसेच वर्षानुवर्षे अंगणवाडी कर्मचा-यांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशा अंगणवाडी कर्मचा-यांच्या अनेक मागण्या आहेत.