किन्हवली : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे शहापूर पंचायत समिती एकात्मिक बालविकास प्रकल्प शहापूर व डोळखांब प्रकल्पाच्या शेकडो अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारी ५६९ मोबाइल परत केले. माेबाइल निकृष्ट आणि नादुरुस्त असल्याची तक्रार करण्यात आली.
शासनाने अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीच्या कामकाजासाठी दिलेले मोबाइल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून जुना झाल्याने सतत नादुरुस्त होत आहेत. मोबाइल दुरुस्तीसाठी जास्तीचा खर्च येत असून तो सेविकांकडून वसूल केला जातो. म्हणून नवीन मोबाइल द्यावा, शासनाने लादलेला पोषण ट्रॅकर ॲप सदोष आहे. इंग्रजी येत नसल्याने तो हाताळण्यास अडचणी येतात. रिक्त जागेवर तोबडतोब भरती करावी, अशा अनेक मागण्यांचे एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे महिला व बालविकासमंत्र्यांना देण्यात आले होते. १७ ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा, अशी विनंती केली होती. मात्र त्याची वेळीच दखल न घेतल्याने शेकडो अंगणवाडी सेविका संतप्त होऊन डोळखांब व शहापूर प्रकल्पात मोबाइल वापसी आंदोलन केले. यावेळी शहापूर पंचायत समिती सभापती यशोदा आवटे, उपसभापती जगन पष्टे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या अपर्णा पानसरे, भगवान दवणे, जयश्री सांबरे, मीना शेंडे, रोहिणी माळी, छाया म्हसकर, कल्पना भंडागे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
काेट
महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी हे मोबाइल परत करणार असून शहापूर प्रकल्पातील शंभर टक्के अंगणवाडी सेविकांनी मोबाइल परत केलेले आहेत.
- अपर्णा पानसरे.
उपाध्यक्षा,
अंगणवाडी कर्मचारी संघटना