ठाणे : महिला व बालविकास विभाग व राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनामध्ये जिल्ह्यासह राज्यभरात तब्बल दाेन लाख अंगणवाडी सेविका सक्रीय कार्यरत आहेत. पण महिला व बालविकास विभागाने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न केल्यामुळे त्याविराेधात या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व प्रक्षोभ खदखदत आहे. सरकारच्या या अनास्थेच्या वृत्तीबद्दल जिल्ह्यासह राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी साेमवारपासून बेमुदत असहकार आंदाेलन हाती घेतले आहे. त्यामुळे ऐन पावाळ्यात कुपाेषीत बालकांसह मातांच्या पुरक पाेषण आहारावर, आराेग्याच्या संदर्भ सेवा, आराेग्य तपासणीच्या कामांवर विपरीत परिणाम हाेणार आहे.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अॲड. एम.ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांसह राज्यभरातील सेविकांनी आजपासून हे असहकार आंदाेलन छेडले आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत असलेल्या या अंगणवाडी सेविकांची प्रलंबित मानधन वाढ, दरमहा पेन्शन, ग्रॅच्युइटी इ. मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हे असहकार आंदाेलन हाती घेतले आहे. त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात कुपाेषीत बालकांच्या पाेषण आहारासह त्यांच्या आराेग्य तपासणी व औषधाेपचारात खंड पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आंदोलनात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामाचे मासिक अहवाल देणार नाही, मासिक सभेत व शासकिय बैठकांमध्ये बहिष्कार टाकतील. तसेच राज्यभर जिल्हा परिषद, मुख्यमंत्री, ठिकठिकाणचे मंत्री यांच्या कार्यालयावर तीव्र निदर्शने करतील, असे संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले.