ठाणे : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा देण्यासह पेन्शन योजना लागू करावी, कर्मचाऱ्यांना मानधनवाढ द्यावी, मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांइतकेच मानधन द्यावे, लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराच्या रकमेत दुप्पट वाढ करावी, निर्दोष व मराठी पोषण ट्रकर ॲप द्यावे यासाठी येथील अंगणवाडी सेविकांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इरानी यांची सोमवारी मुंबईत भेट घेऊन साकडे घातले.
इरानी मुंबई दौऱ्यावर असल्याचे कळताच या सेविकांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली त्यांची भेट घेतली. या वेळी स्मृती इराणी यांच्यासह महिला व बालविकास विभाग सचिव व आयुक्त रुबल अग्रवाल या तिघींनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर, अंगणवाडी कृती समितीच्या नेत्यांशी सविस्तर चर्चा करून मागण्यांवर सहानुभूती दाखविल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे नेते ॲड. एम. ए. पाटील यांनी सांगितले. या बैठकीत निकृष्ट शासकीय मोबाइलच्या प्रश्नावरही जोरदार चर्चा झाली. पण, मोबाइलची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे इराणी यांनी स्पष्ट केले. तर सचिवांनी मोबाइलविषयी संघटनेशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन या वेळी सचिवांनी दिले. या शिष्टमंडळात ॲड. पाटील यांच्यासह नंदा पेडणेकर, ज्योती भाटवडेकर, नफिसा नाखवा, संगीता चाचले, राजेश सिंह, मीना मोहिते, संगीता शिंदे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.