ठाणे : कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर कमी पडू नये, म्हणून कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची भरती करण्यात येत आहे. मात्र शिक्षणाची वर्षे, कामाचे स्वरुप आणि कोरोनाचा धोका समान असतानाही एमबीबीएस डॉक्टरला ७५ हजार रुपये आणि बीएएमएस डॉक्टरला अवघे २८ हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या डॉक्टरांमध्ये सध्या तीव्र संताप ऐकायला मिळत आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने उपचार करण्यासाठी डॉक्टरांची फौज तैनात करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सरसावला आहे. यासाठी ठाणे व नवी मुंबई आदी ठिकाणी डॉक्टर नियुक्तीच्या जाहिराती झळकायला लागल्या आहेत. त्यातील ठाणे येथील सिव्हील रुग्णालयाच्या नियंत्रणातील डॉक्टरांच्या मानधनात मोठी तफावत दिसून येत आहे. एमबीबीएस डॉक्टरला ७५ हजार रुपये मानधन निश्चित केले आहे . परंतु एमबीबीएसच्या अभ्यासक्रमाइतकीच वर्षे आयुर्वेदिकचा अभ्यास पूर्ण करणाऱ्या बीएएमएस डॉक्टरला अवघे २८ हजारांचे मानधन देण्यात येणार आहे. या वेतनातील तफावतीमुळ बीएएमएस डॉक्टरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.ठाण्यापेक्षा नवी मुंबईत नियुक्त होणाºया कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात तफावत दिसून येत आहे. ठाण्याच्या तुलनेत एमबीबीएस डॉक्टरला ६५ हजार, तर बीएएमएस डॉक्टरला ५५ हजार रुपये मानधन निश्चित केले आहे. मात्र समान काम, समान वेतन या धोरणाप्रमाणे या डॉक्टरांच्या मानधनात तफावत ठेवायला नको, अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. बीएएमएस डॉक्टरांना ५0 लाखांचा विमा व लागण होताच मोफत उपचार मिळायला पाहिजे, असे डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले.