ठाणे : ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांची सभा शुक्रवारी घेण्यात आली. मात्र, तिला गर्दीच न झाल्याचे खापर शिवसेनेने भाजपवर, तर भाजपने शिवसेनेवर फोडले आहे. मात्र, गर्दी का जमविता आली नाही, याचा जाब आता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्या ठाण्यातील सर्व नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना केला. असे गाफील राहून चालणार नाही. अतिआत्मविश्वास बाळगू नका. विरोधक त्याचा फायदा घेतील, असे खडेबोल त्यांनी शनिवारी नगरसेवकांना सुनावले.
शुक्रवारी ठाण्यात महापालिका मुख्यालयासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती. मात्र, तिला गर्दी जमविण्यात भाजपला अपयश आल्याचे उघड झाले. विरोधकांनी तर या कमी गर्दीच्या खुर्च्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून चांगलेच तोंडसुख घेतले. यामुळे या मुद्यावरून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी सायंकाळी भाजपच्या खोपट येथील कार्यालयात भाजपच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाºयांची शाळा घेतली. सुरुवातीला शिवसेना गर्दी जमवेल, असे काहींना वाटत होते. मात्र, हा मतदारसंघ तुमचा असल्याने तुम्ही गर्दी आणाल, असे शिवसेनेने भाजपच्या मंडळींना सांगितले. याच सावळ्या गोंधळामुळे मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
गाफील न राहण्याचा दिला सल्ला : वास्तविक पाहता, असे का घडले, कोणामुळे घडले, यात कोण दोषी आहे, त्यामध्ये न जाता यापुढे अशी चूक होऊ नये, याची काळजी घ्या, अशी समजही चव्हाण यांनी सर्वांना दिली. आपला विजय निश्चित आहे, हे जरी सत्य असले, तरी गाफील राहू नका. अतिआत्मविश्वासात तर अजिबात राहू नका. सभेला गर्दी का जमवता आली नाही, याचे खापर एकमेकांवर फोडण्यापेक्षा आपण कुठे चुकलो, याचा अभ्यास करण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी सांगितले. गाफील न राहता गांभीर्याने याचा विचार करावा आणि सर्वांनी एकदिलाने काम करा, असा सल्लाही त्यांनी शेवटी दिला.